खरात प्रकरणात त्या निनावी पत्राने खळबळ, आता चाकणकरांनीही सोडलं मौन, म्हणाल्या 28 दिवस…
बीडमधील एका महिला पदाधिकाऱ्याद्वारे स्थानिक महिलांना अशोक खरातकडे पाठवले जात होते आणि हे सर्व कथितपणे रुपाली चाकणकर यांच्या आशीर्वादाने घडत होते असे एक पत्र बीडमधून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना मिळाले होते. आता या प्रकरणावर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने खळबळ माजली आहे. अशोक खरातने अनेक महिलांवार लैंगिक अत्याचार करुन शोषण केल्याचे समोर आले. अनेक महिलांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. सध्या अशोक खरातची SIT चौकशी सुरु आहे. दरम्यान, अशोक खरातचे राजकीय कनेक्शनची देखील चर्चा झाली. अशोक खरातचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर बीडमधून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना एक निनावी पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रात असा दावा करण्यात आला आहे की, बीडमधील एका महिला पदाधिकाऱ्याद्वारे स्थानिक महिलांना अशोक खरातकडे पाठवले जात होते आणि हे सर्व कथितपणे रुपाली चाकणकर यांच्या आशीर्वादाने घडत होते. आता या प्रकरणावर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे पोस्ट?
रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. “महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले,त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले.मात्र आज 28 दिवस होत आहेत, माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी होत आहेत, हे वेळोवेळी समोर येत आहे.याबाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले”, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.
महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले,त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले.मात्र आज 28 दिवस होत आहेत, माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 14, 2026
पुढे त्या म्हणाल्या, “तसेच, निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले? कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी, पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले ,हे घडवून आणण्यामागे कुणाचे “सौजन्य “होते हे समोर आले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याने महत्त्व देता येत नाही,हे माध्यमांसमोर येत स्पष्ट केले आहे . तरीही, खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिले,कोठून आले याची चौकशी झालीच पाहिजे.”
पोस्टच्या शेवटी रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “यानिमित्ताने एक नवा चुकीचा पायंडा पाडला जात आहे.केवळ तर्कवितर्क,अंदाज, सुरस कथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय,बदनाम केले जात आहे,हे अत्यंत खेदजनक आहे.मी पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणाने भूमिका मांडत आले आहे.खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात,जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही.शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच,हा माझा दृढ विश्वास आहे. तरीही गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमधून माझ्याविरोधी एकतर्फी येणाऱ्या बातम्या यावर मी प्रतिक्रिया किंवा कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही कारण SIT व चौकशी करत असलेल्या तपास यंत्रणेला निष्पक्षपणे चौकशी करता यावी हाच हेतू आहे.”