महाराष्ट्राच्या लेकीचा अमेरिकेत अखेरचा श्वास, 1 वर्ष 27 दिवसांनी नीलमचा मृत्यू
महाराष्ट्रातील कराड येथील नीलम शिंदे हिचा अमेरिकेत दुर्दैवी अपघात होऊन ती 13 महिने कोमात होती. 28 मार्च 2026 रोजी तिचे निधन झाले. तिच्या मृत्यूने साताऱ्यावर शोककळा पसरली आहे. नीलमच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूनंतर अवयवदान (डोळे, त्वचा) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, ज्यामुळे अनेकांना नवजीवन मिळणार आहे. युद्धामुळे तिचे कुटुंबीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकणार नाहीत.

महाराष्ट्रातील साताऱ्याच्या कराड तालुक्यातील उंब्रज वडगाव येथील नीलम तानाजी शिंदे हिचा 14 फेब्रुवारी 2025 रोजी अमेरिकेतील सॅक्रामेंटो येथे सायंकाळी 7.30 वाजता (अमेरिकन वेळेनुसार) दुर्दैवी अपघात झाला. त्या अपघातानंतर तिला तात्काळ युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या दिवसापासून ती कोमामध्ये होती. डॉक्टरांनी तिच्यावर शक्य ते सर्व उपचार केले, परंतु प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. जवळपास 13 महिने तिच्यावर उपचार सुरू होते. अपघातात झालेल्या गंभीर दुखापतींमुळे अखेर तिच्या शरीराने साथ दिली नाही आणि 28 मार्च 2026 रोजी उपचार सुरू असतानाच तिचे दु:खद निधन झाले. तब्बल 1 वर्ष 27 दिवसांनी नीलमने अखेरचा श्वास घेतला. तिच्या जाण्याने संपूर्ण साताऱ्यावर शोककळा पसरली आहे.
नीलम अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेली होती. कॅलिफोर्नियामध्ये रस्त्यावरून चालत असताना एका वाहनाने तिला मागून जोरात धडक दिली होती. या अपघातात नीलमच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून कवटीचे फ्रॅक्चर, तसेच हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आहेत. तेव्हापासून ती कोमात होती. या अपघाताची माहिती भारतात असलेल्या नीलमचे वडील तानाजी शिंदे, मामा संजय कदम यांना मिळाल्यानंतर व्हिसा मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. कुटुंबातील लोकांची धडपड पाहून सरकारने दखल घेत यूएस वाणिज्य दूतावासाकडे व्हिसासाठी मागणी केली असता त्या कुटुंबाला तातडीने व्हिसा देण्यात आला.
अवयव दानाचा निर्णय
नीलम अपघात झाल्यापासून कोमातच होती. तिला वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. तब्बल 1 वर्ष 27 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या नीलमने अखेरचा श्वास घेतला. नीलमच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिचे डोळे आणि त्वचा (स्कीन) दान करण्यात आली आहे. त्यामुळे इतरांना नवजीवन मिळणार आहे. तिच्यावर आज 07 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता (अमेरिकन वेळेनुसार) Mount Vernon Memorial Park येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नीलमवर अंत्यसंस्कार होत असताना आखाती देशातील युध्दामुळे तिचे वडील आणि कुटुंबीय अमेरिकेत उपस्थित राहू शकत नाहीत. तर अमेरिकेत स्थायिक असलेली नीलमची आत्या सर्व विधी पार पाडणार आहे.