लहान मुलांमधील वाढता कोरोना संसर्ग धोकादायक, वेळीच लक्ष देऊन उपाययोजना करा, शिवसेना खासदाराचे पंतप्रधान मोदींना पत्र

| Updated on: Apr 30, 2021 | 2:07 PM

तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी विनंती शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. (Rahul Shewale Letter to PM Narendra Modi)

लहान मुलांमधील वाढता कोरोना संसर्ग धोकादायक, वेळीच लक्ष देऊन उपाययोजना करा, शिवसेना खासदाराचे पंतप्रधान मोदींना पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट तीव्र झाले आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 10 वर्षांखालील लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसत आहे. या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष देऊन तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी विनंती शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. (Shivsena MP Rahul Shewale Letter to PM Narendra Modi and CM Uddhav Thackeray on Corona Situation)

राहुल शेवाळे यांनी याबाबत पत्र लिहिले असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनाही पाठवले आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी विविध राज्यांतील लहान मुलांच्या कोरोना संसर्गाची आकडेवारीही नमूद केली आहे. याद्वारे त्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे.

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचे संपूर्ण पत्र

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसते आहे. ‘इंडियन अकॅडमी ऑफ पेडिऍट्रीक्स’नेही लहान मुलांमधील वाढत्या संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात 1 मार्च ते 4 एप्रिल 2021 पर्यंत एकूण 60, 684 लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. यातील सुमारे 9,882 मुले 5 वर्षांखालील आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येच्या 20 टक्के रुग्णसंख्या ही लहान मुलांची आहे.’

‘केंद्रीय आरोग्य खात्याकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील 5 राज्यांमध्ये एकूण 79 हजार 688 मुले कोरोनाबाधित झाली आहेत. छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली मध्ये कोरोनाबाधित लहान मुलांचा आकडा हा अनुक्रमे 5940, 7327, 3004 आणि 2733 इतका आहे. हरियाणा सरकारच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 11 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान 11 हजार 344 कोरोनाबाधित लहान मुले आढळून आली. यावरून भविष्यातील मोठ्या संकटाची कल्पना येऊ शकते.

आजमितीला लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस अस्तित्वात नसल्याची बाब नमूद करून खासदार शेवाळे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, ‘लहान मुलांमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका वेळीच लक्षात घेऊन देशातील तज्ज्ञ डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. लहान मुलांसाठी योग्य ती औषधे,जम्बो कोविड सेंटर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मास्क यांची व्यवस्था करणेही गरजेचे आहे. तसेच लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लशींच्या निर्मितीसाठी देशभरात प्रयत्न करणाऱ्या कंपन्यांना सरकारने योग्य ते सहाय्य करावे, असे पत्र शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी लिहिले आहे.

(Shivsena MP Rahul Shewale Letter to PM Narendra Modi and CM Uddhav Thackeray on Corona Situation)

संबंधित बातम्या : 

BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी पुन्हा संवाद साधणार; कोरोनासंदर्भात महत्त्वाची घोषणा करणार?

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करा; ‘आप’ आमदाराच्या मागणीला भाजपचे समर्थन