राज्यात दुष्काळ, भाजप नेते नाचगाण्यात मश्गूल, एकाच्या कार्यक्रमात गौतमीचा डान्स तर दुसऱ्याच्या विदेशी महिलांचा नाच

राज्यावर दुष्काळाचं संकट आहे, मात्र दुसरीकडे मंत्री जयकुमार रावल हे नाचगाण्यात मश्गूल असल्याचे दिसून आलं. तर  भाजप नेते कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त देखील गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

राज्यात दुष्काळ, भाजप नेते नाचगाण्यात मश्गूल, एकाच्या कार्यक्रमात गौतमीचा डान्स तर दुसऱ्याच्या विदेशी महिलांचा नाच
Jaykumar Rawal
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 23, 2026 | 9:01 PM

राज्यात पावसाभावी भीषण दुष्काळ पडला आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाणी दौरा सुरू केला आहे. राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.  दुसरीकडे मात्र राज्यातील मंत्री जयकुमार रावल हे नाचगाण्यात मश्गूल असल्याचे दिसून आलं. तर  भाजप नेते कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त देखील गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावरून आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

एकीकडे राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे जयकुमार रावल हे त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमावरून आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. रावल यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त नाचगाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जयकुमार रावल यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात काही परदेशी महिलांनी नृत्य केल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. हे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता यावरून विरोधाकांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी रावल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

जयकुमार रावल हे सोलापूरचे आहेत. सोलापुरात खूप मोठा दुष्काळ आहे. त्यामुळे दुष्काळ भागातील लोकप्रतिनिधिंनी अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. मुलांचे वाढदिवस दरवर्षी साजरे होतात. पुढच्या वर्षी देखील साजरे होतील. असं म्हणतात मृत्यू एकदाच येतो, मात्र वाढदिवस तर दरवर्षी येतो. मग ही भावनाच त्यांच्या डोक्यात नसेल तर मग यांना दु:ख कशाचं आहे? हा दिखावा मंत्रिमंडळ कशासाठी करत आहे? दुष्काळावर बैठका घेतल्या जात आहे, परंतु यावरून असं दिसतं की हा दिखावा आहे. हे सोंग आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जयकुमार रावल हे मुलाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमावरून चर्चेत आले असतानाच दुसरीकडे भाजप नेते कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावर देखील सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us