गाईची धार काढत गवतांचे ओझे वाहणाऱ्या तरुणांचं यश, सोलापुरात सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्यांची यशोगाथा

| Updated on: Jan 20, 2021 | 4:41 PM

ग्रामपंचायत निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेत.  प्रिंयका रेडके (बळेवाडी, बार्शी) आणि ऋतुराज देशमुख (घाटणे, मोहोळ) असं या तरुणांचं नाव आहे.

गाईची धार काढत गवतांचे ओझे वाहणाऱ्या तरुणांचं यश, सोलापुरात सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्यांची यशोगाथा
Follow us on

सोलापूर : राज्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या ग्रामपंचायत निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेत.  प्रिंयका रेडके (बळेवाडी, बार्शी) आणि ऋतुराज देशमुख (घाटणे, मोहोळ) असं या तरुणांचं नाव आहे. त्यामुळेच तरुणांच्या गावातील राजकारणात वाढत्या सहभागावरील हा स्पेशल रिपोर्ट (Success story of Youngest Gram Panchayat Members of Solapur).

प्रियांका रेडके बार्शीतल्या बळेवाडी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेली सर्वात तरुण उमेदवार आहे. तिचं वय आहे अवघं 21 वर्ष आणि 18 दिवस. कदाचित ही महाराष्ट्रातली निवडून आलेली सर्वात कमी वयाची उमेदवार असावी. दुसरीकडे मोहोळ तालुक्यातील घाटणे गावचा ऋतुराज हा देखील अवघ्या 21 वर्ष 6 महिन्याचा तरुण उमेदवार ग्रामपंचायत सदस्य झालाय.

प्रियांका सध्या बीएच्या तिसऱ्या वर्षात शिकतेय, तर ऋतुराज नुकताच पदवीधर झालाय. त्याला वकिलीचं शिक्षण घ्यायचंय आणि गावाचा विकास करायचाय, तर प्रियांका गाईची धार काढते, मोटारसायकल चालवते मोटारसायकलीवरून ती गवत आणते, घरातील सर्व कामे करते, संपूर्ण घर सांभाळते आणि आता ती गाव देखील सांभाळणार आहे. प्रियंकाची आई वंदना रेडके यांनी मुलीच्या यशावर आनंद व्यक्त केलाय. ऋतुराजचे वडील रवींद्र देशमुख यांनी देखील मुलगा ग्रामपंचायतमध्ये चांगलं काम करेल, अशी आशा व्यक्त केलीय.

विशेष म्हणजे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच प्रियंकाला 21 वर्ष पूर्ण झालीत. ती मागासवर्ग प्रवर्गातून असूनही खुल्या गटातून तिला गावकऱ्यांनी निवडून दिलंय. त्यामुळे बळेवाडी गावाचं चांगलंच कौतुक होत आहे. तर ऋतुराज हा स्वतःच पॅनल प्रमुख आहे. तो इतक्या कमी वयात सर्व सदस्यांचं नेतृत्व करतोय. त्यामुळे नक्कीच भविष्यात त्याच्यातून कणखर नेतृत्व तयार होईल यात काही शंका नाही. घाटणेचे (मोहोळ) उपसरपंच मनोज गायकवाड हे विरोधी पक्षाचे नेते असतानाही त्यांनी ऋतुराजकडून खूप अपेक्षा असल्याची भावना व्यक्त केलीय.

गावात उमललेलं प्रियांका आणि ऋतुराज सारखं नेतृत्व हे राज्याला देखील नवी दिशा दाखवतंय. राज्याचं आणि देशाचं देखील नेतृत्व करण्याची ताकद गावातल्या तरुणाईमध्ये आणि नेतृत्वामध्ये असते. फक्त गावाकडे पाहणाऱ्या नेतेमंडळींची दृष्टी बदलली पाहिजे आणि गावकऱ्यांची दूरदृष्टी वाढली पाहिजे एवढाच काय तो बदल सजग नागरिक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

ग्रामपंचायतीचा कौल, नाशकात भाजपला पालिकेसाठी धोक्याची घंटा?

जयंत पाटील म्हणतात, ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी अव्वल, काँग्रेस चौथी!

पुण्यातील सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य, पूनम कडवळेची 21 वर्षी ग्रामपंचायतीत एन्ट्री

Success story of Youngest Gram Panchayat Members of Solapur