मशिद पाडल्याचा बदला..भिवंडी दहशतवाद्यांच्या रडारवर, थेट पाकिस्तानात हँडलर्सपर्यंत पोहोचले व्हिडिओ
काही दिवसांपूर्वी वांद्रे गरीबनगर येथे रेल्वेच्या अतिक्रमण केलेल्या जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं. यात अनधिकृत मशीदही होती. या मशिदीच्या पाडकामाचा बदला घेण्यासाठी कारस्थानं रचली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अलीकडेच दिल्ली पोलिसांनी कारवाई केली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI शहजाद भट्टी गँगच्या मदतीने भारतात दहशतवादी कारवाया करण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, त्याआधीच दिल्ली पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला. आता उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने दानियाल अशरफ आणि कृष्णा मिश्रा या दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून मुंबई जवळच्या भिवंडी संदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी भिवंडीतील नरपोली पोलीस ठाण्याची रेकी केल्याचं समोर आलं आहे. तपासात दहशतवादी कटाचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
वांद्रे गरीबनगर येथील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाचा बदला घेण्यासाठी पोलिसांवर हल्ल्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तपासात भिवंडीतील नरपोली पोलीस ठाण्याची रेकी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. उत्तर प्रदेश एटीएसने अटक केलेल्या दानियाल अशरफ आणि कृष्णा मिश्रा या आरोपींपैकी अशरफने नरपोली पोलीस ठाण्याचे फोटो आणि परिसरातील पुलाचा 18 सेकंदांचा व्हिडिओ तयार करून पाकिस्तानस्थित हँडलर्सना पाठवल्याचा आरोप आहे.
‘तहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान’शी संबंध
तपास यंत्रणांच्या मते, आरोपींना पोलिस ठाणी व सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या नेटवर्कचे संबंध कथितरित्या शहजाद भट्टी आणि ‘तहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान’शी असल्याचा संशय असून, आयएसआयच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे. सोशल मीडियाद्वारे तरुणांना पैशांचे आमिष दाखवून संवेदनशील ठिकाणांची रेकी करण्यासाठी वापरले जात असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. सदर प्रकरणात सखोल चौकशी तपास यंत्रणे मार्फत सुरु आहे.
शहजाद सोबत या कटात ISI एजंट्स सुद्धा
दानियाल अशरफ आणि कृष्णा मिश्रा यांचं दिल्ली मॉड्यूलशी कनेक्शन समोर आलं आहे. या वर्षी एप्रिल-मे महिन्यात यूपी एटीएसने 8 संशयित दहशतवाद्यांना देशविरोधी कारवायांप्रकरणी अटक केली आहे. दिल्ली स्पेशल सेलने पकडलेले सर्व संशयित सोशल मीडियाद्वारे कृष्णा आणि अशरफच्या संपर्कात होते. दोन्ही मॉड्यूल पाकिस्तान स्थित गँगस्टर शहजाद भट्टी हँडल करत होता. शहजाद सोबत या कटात ISI एजंट्स सुद्धा आहेत.
काही दिवसांपूर्वी कुशीनगरमधून कृष्णा मिश्रा आणि बाराबंकी येथूीन दानियाल अशरफला देशविरोधी कारवायांप्रकरणी अटक केली. दोघांची कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या मोबाईलमधून मिळालेल्या पुराव्यांमध्ये मोठा खुलासा झाला.