विवाहितेला फार्महाऊसवर नेलं अन..भाजपच्या माजी आमदारावर गंभीर आरोप, दिला सर्व पदांचा राजीनामा

"पिडीत तरुणीने माझ्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील मोबाईल वर संपर्क साधून मदत मागितली. मी तिला भेटले असता तिने जी घृणास्पद हकीकत सांगितली ती ऐकून माझ्या पायाखालची जमीन हादरली. तिच्या जवळील व्हिडिओ व मोबाईल चॅट बघितल्यानंतर मी तत्काळ पिडीत तरुणीला घेऊन रात्री पडघा पोलिस ठाण्यात दाखल झाले"

विवाहितेला फार्महाऊसवर नेलं अन..भाजपच्या माजी आमदारावर गंभीर आरोप, दिला सर्व पदांचा राजीनामा
Narendra Pawar
| Updated on: Sep 17, 2026 | 2:03 PM

कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र पाठवत राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली. स्वतःविरुद्ध दाखल झालेले गुन्हे खोटे असून बदनामीचे षडयंत्र रचल्याचा पत्रात दावा केला आहे. सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पवारांच्या राजीनाम्यामुळे कल्याणच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून पदांचा राजीनामा देत असल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे. नरेंद्र पवार हे भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावरही कार्यरत होते. पीडितेवर सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याविरुद्ध पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

मदत करण्याच्या बहाण्याने पिडीत तरुणीस आपल्या कार्यालयात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा नरेंद्र पवारांवर आरोप आहे. तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याच प्रकरणात बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी पहाटे शस्त्राचा धाक दाखवून दारू पाजून सामूहिक शारीरिक अत्याचार केल्याचा पीडीत तरुणीने आरोप केला आहे.

रात्री दोन वाजता माजी आमदार निघून गेले

पीडीत विवाहित तरुणीचा पती सोबत वाद असल्याने त्या वादात मध्यस्थी करण्यासाठी म्हणून माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तरुणीला आपल्या कार्यालयात बोलावले होते. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी माजी आमदार नरेंद्र पवार व त्यांचा साथीदार बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे घेऊन गेले. तिला शस्त्रांचा धाक दाखवून दारू पाजून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

रात्री दोन वाजता माजी आमदार नरेंद्र पवार तेथून निघून गेल्यानंतर शैलेश पाटील याने सुद्धा या पिडीत तरुणीवर अत्याचार केल्यानंतर पहाटे चार वाजता शैलेश पाटील यांच्या घरचा केअर टेकर याने पिडीत तरुणीला तिच्या घरी आणून सोडले.घाबरलेल्या पिडीत तरुणीने 16 सप्टेंबर रोजी काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्याकडे मदत मागितली.

व्हिडिओ व मोबाईल व्हॉट्सॲप चॅट दाखवले 

तेव्हा तरुणीने आपल्यावर भाजपा माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील याने अत्याचार केल्याचे व त्या संबंधी आपल्याकडे व्हिडिओ व मोबाईल व्हॉट्सॲप चॅट असल्याचे दाखविले. त्यानंतर पिडीत तरुणीला घेऊन रात्री कांचन कुलकर्णी पडघा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या.तेथे पहाटे माजी आमदार नरेंद्र पवार व शैलेश पाटील या दोघां विरोधात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मला आता न्याय द्यावा .यांनी अशा पद्धतीने किती महिलांचे आयुष्य उध्वस्त केले असेल त्यामुळे यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी पिडीत तरुणीने केली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us