कल्याण डोंबिवलीची वाहतूक कोंडीबाबत श्रीकांत शिंदेंची एमएमआरडी आयुक्तांसोबत बैठक

| Updated on: Jul 12, 2021 | 9:54 PM

कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणारा एलीव्हेटेट 400 कोटी रुपयांचा पूल तयार करण्यात येणार आहे. कल्याण-पुणे लिंक रोडवरुन विठ्ठलवाडी येथून थेट हा पूल कल्याण पश्चिमेतील भवानी चौकात उतरणार आहे. त्याचा डीपीआर तयार आहे.

कल्याण डोंबिवलीची वाहतूक कोंडीबाबत श्रीकांत शिंदेंची एमएमआरडी आयुक्तांसोबत बैठक
कल्याण डोंबिवलीची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खासदारांची एमएमआरडी आयुक्तांसोबत बैठक
Follow us on

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहाड उड्डाणपूलाचे चौपरीकरण, कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणारा 400 कोटी रुपये खर्चाचा एलीव्हेटेड पूल आणि नेवाळी नाक्यावरील उड्डाणपूल यांना गती देण्यासाठी कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी शिंदे यांनी आज एमएमआरडीए आयुक्तांसोबत मुंबई कार्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीस कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे उपस्थित होते. (Meeting of MPs with MMRD Commissioner to resolve traffic congestion in Kalyan Dombivali)

शहाड पुलाचे चौपदरीकरण होणार

कल्याण-मुरबाड-नगर मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. या मार्गावरील वालधूनी पूल चौपदरी झाला आहे. शहाड येथील रेल्वे उड्डाणपूलाचेही चौपदरीकरण करण्याची मागणी एमएमआरडीएकडे करण्यात आल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. याचा डीपीआर तयार करण्याचे आदेश एमएमआरडीएने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. डीपीआर तयार झाल्यावर पूलाच्या बांधकामासाठी किती खर्च होईल हे स्पष्ट होणार आहे.

कल्याण पूर्व पश्चिमेला जोडण्यासाठी एलिव्हेटेड ब्रिज बांधणार

कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणारा एलीव्हेटेट 400 कोटी रुपयांचा पूल तयार करण्यात येणार आहे. कल्याण-पुणे लिंक रोडवरुन विठ्ठलवाडी येथून थेट हा पूल कल्याण पश्चिमेतील भवानी चौकात उतरणार आहे. त्याचा डीपीआर तयार आहे. त्याची रेल्वेकडून डीएडी मंजूरी आवश्यक आहे. हा पूल तयार झाल्यावर कल्याण पूर्व पश्चिम गाठण्यासाठी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे असे खासदार शिंदे यांनी सांगितले.

कल्याण मलंग रोडवरील नेवाली नाक्यावर उड्डाणपूल होणार

कल्याण मलंग रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. हा रस्ता अंबरनाथ शीळ रस्त्यास नेवाळी नाक्यावर जोडतो. नेवाळी नाक्यावरी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी त्या ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्याची मागणी खासदार शिंदे यांनी एमएमआरडीएच्या आयुक्तांकडे केली आहे. त्याचाही डीपीआर लवकर तयार केला जाणार आहे.

केडीएमसीतील रिंग रोडला गती मिळणार

गेल्याच महिन्यात खासदार शिंदे यांनी कल्याण दुर्गाडी ते टिटवाळा रिंग रोड प्रकल्पाची पाहणी केली होती. हा रिंग रोड जिथे संपतो त्या ठिकाणाहून पुढे मुरबाड गोवेली नाक्यावर रस्ता नेण्याकरीता डीपीआर तयार करण्यात यावा. टप्पा क्रमांक आठ तयार केला जावा असे शिंदे यांनी सांगितले. याशिवाय मोठा गाव ठाकुर्ली ते दुर्गाडी हा रिंग रोडचा तिसरा टप्पा आहे. त्यासाठी 83 टक्के भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्याची निविदा काढावी अशी मागणी केली. यावेळी येत्या आठवड्यात निविदा काढली जाईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काटई ते मोठा गाव ठाकुर्ली हा रिंग रोडचा तिसरा टप्पा आहे. त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी सुरु करावी असे एमएमआरडीने सूचित केले आहे असे शिंदे यांनी सांगितले. (Meeting of MPs with MMRD Commissioner to resolve traffic congestion in Kalyan Dombivali)

इतर बातम्या

कथित अध्यात्मिक गुरू रघुनाथ येमुल विरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अंनिसची मागणी

PPF खात्याचे 5 मोठे फायदे, छोट्या बचतीवर बंपर रिटर्न मिळण्याची संधी