अनेक वर्ष कलेची साधना, पण वाट्याला गरिबीच, बदलापुरात वयोवृद्ध ‘काष्ठकला’काराची उदरनिर्वाहासाठी धडपड, मदतीच्या हातांची गरज

| Updated on: Sep 29, 2021 | 7:21 AM

ठाणे जिल्ह्यातील बदलापुरात राहणारे ७५ वर्षीय कलाकार आनंद पवार हे एक असेच दुर्लक्षित 'काष्ठकला'कार. सध्या आपल्या कलेतून त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे.

अनेक वर्ष कलेची साधना, पण वाट्याला गरिबीच, बदलापुरात वयोवृद्ध काष्ठकलाकाराची उदरनिर्वाहासाठी धडपड, मदतीच्या हातांची गरज
काष्ठकलाकार आनंद पवार
Follow us on

बदलापूर :  लाकडाला जिवंत करणारी कला म्हणजे काष्ठकला. लाकडाला आकार देऊन एखाद्या कलाकृतीत जिवंतपणा ओतण्याची ही कला. या कलेसाठी हातात कौशल्य आणि मनी कल्पना असावी लागते. ठाणे जिल्ह्यातील बदलापुरात राहणारे ७५ वर्षीय कलाकार आनंद पवार हे एक असेच दुर्लक्षित ‘काष्ठकला’कार. सध्या आपल्या कलेतून त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे.

कधीतरी आपले दिवस येतील

“दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल” या गाण्याच्या ओळी आपल्या आयुष्यात जगण्याची नवी उमेद निर्माण करतात. याच आशेवर सध्या बदलापूरचे ज्येष्ठ ‘काष्ठकला’कार आनंद पवार सध्या आपलं आयुष्य घालवतायत.

‘काष्ठकला’काराचा जगण्यासाठी संघर्ष

७५ वर्षांचे आनंद पवार हे बदलापुरात त्यांची पत्नी माया पवार आणि मुलगा राहुल याच्यासोबत राहतात. पूर्वी सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या पवार यांना एका अपघातानंतर नोकरी गमवावी लागली. त्यातच एका कौटुंबिक घटनेनंतर त्यांच्या मुलाला मोठा मानसिक धक्का बसला आणि तो मनोरुग्ण झाला. या सगळ्या परिस्थितीमुळे हताश होऊन एका वळणावर आयुष्य संपवण्याचा विचार आनंद पवार यांच्या मनात आला होता. पण त्यांच्या पत्नीनं त्यांना धीर दिला आणि कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी पवार यांच्या पत्नीनं उतारवयात छोटी मोठी कामं सुरू केली.

आनंद पवार यांच्याकडे लाकडापासून कलाकुसर करून विविध वस्तू तयार करण्याची कला होती. नोकरी करत असताना फावल्या वेळात त्यांनी अशा अनेक वस्तू तयार केल्या होत्या. साग, शिसं, चंदन, देवनार आदी लाकडांपासून पवार यांनी बहुमजली जहाज, लहान मोठी घरं, निरनिराळे पक्षी, प्राणी आणि अशा अनेक वस्तू तयार केल्या आहेत. त्यांची हीच कला उतारवयात त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन बनली.

कोरोना काळात कंबरडं मोडलं

पवार यांनी तयार केलेल्या वस्तूंचे फोटो त्यांच्या काही परिचितांनी सोशल मीडियावर टाकले आणि त्यातून हळूहळू पवार यांनी तयार केलेल्या वस्तू विकल्या जाऊ लागल्या. त्यामुळं पवार यांनी आपली हत्यारं पुन्हा बाहेर काढत या काष्ठकलेला पुन्हा एकदा सुरुवात केली. आनंद पवार यांनी आगपेटीत मावतील इतक्या आकाराच्या १०० लाकडी वस्तू बनवल्या होत्या. त्यानंतर त्यांची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली. आनंद पवार यांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य भाव मिळत नसल्यानं त्यांनी या वस्तू बदलापुरात अक्षरशः रस्त्यावर बसून देखील विकल्या आहेत. कोरोना काळात त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा कलाकृती साकारत नव्यानं आयुष्याला सुरुवात केलीये. माझ्या या प्रवासात पैसे देऊन नको, पण माझ्या वस्तू विकत घेऊन मला मदत करा, असं आवाहन आनंद पवार यांनी केलं आहे.

पारंपरिक हत्यारांचा वापर करुन कलाकृती

आनंद पवार हे या लाकडी कलाकृती साकारत असताना कोणत्याही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नाहीत. पटाशी, हातोडी, कानस या पारंपरिक हत्यारांचा वापर करून ते या कलाकृती साकारतात. त्यांची पत्नी माया पवार त्यांना एका कागदावर रेखाचित्र साकारून देतात आणि त्यांनतर आनंद पवार हे लाकडी कलाकृती साकारतात. माया पवार यांचीही आनंद पवार यांना मोठी साथ लाभते.

कलेला दाद द्या, फक्त आर्थिक मदत नको तर वस्तू विकत घ्या, बदलापूरच्या कलाकाराचा जगण्याचा संघर्ष

कधीकाळी नैराश्यातून आपलं आयुष्य संपवण्याचा विचार करणाऱ्या आनंद पवार यांनी आता एका नव्या आयुष्याला सुरुवात केलीये. मात्र या प्रवासात त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. नुसतीच आर्थिक मदत नव्हे, तर त्यांच्या कलेला दाद देऊन त्यांच्या वस्तू विकत घेऊन केलेली मदत.. कारण यावरच त्यांचं उतारवयातलं जगणं अवलंबून आहे.

हे ही वाचा :

मोफत शिवभोजन थाळी लवकरच बंद!, 1 ऑक्टोबरपासून पैसे मोजावे लागणार

प्रेमविवाह केल्याचा राग, भावाकडून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, बहिणीचेही केले अपहरण