Thane Crime: गळा दाबला… बेदम मारहाण, महापौरांचा चालक की गुंड? ठाणे महापालिकेसमोरच कॅमेरामनवर हल्ला
Thane Mayor Cameraman Assaulted Cameraman: मिरा-भाईंदर इथे पत्रकार आणि कॅमेरामनवर हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता ठाण्यात महानगरपालिकेसमोरच कॅमेरामनला मारहाण करण्यात आली. महापौरांच्या वाहनावरील चालकानेच ही मारहाण केल्याचे समोर आले आहे.

गणेश थोरात, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: ठाण्याचे महापौर शर्मिला पिंपलोळकर यांच्या चालकाने ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या समोरच एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामन विनय राजभर यांना जबर मारहाण केली आहे. या मारहाणी मध्ये विनय राजभर यांना मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झाली आहे. नौपाडा पोलिसांनी वेळीच चालक सुनील खरपडे यांना ताब्यात घेतले आहे. पत्रकारांना अशा प्रकारची मारहाण कोणीही खपून घेणार नाही याबाबत ठाणे दैनिक पत्रकार संघाच्या वतीने निषेध नोंदवला जात आहे. मिरा-भाईंदर इथे पत्रकार आणि कॅमेरामनवर हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता ठाण्यात महानगरपालिकेसमोरच कॅमेरामनला मारहाण करण्यात आल्याने निषेधाचा सूर आळवण्यात आला आहे.
कॅमेरामनला मारहाण
ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या समोरच एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामन विनय राजभर यांना जबर मारहाण करण्यात आली. नौपाडा पोलिसांनी वेळीच चालक सुनील खरपडे यांना ताब्यात घेतले आहे. या मारहाणीचे कारण काय आहे ते समोर आलेले नाही. पण महापालिकेसमोरच अशी गुंडगिरी होत असल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मिरा-भाईंदरमध्ये सुद्धा अशाच प्रकारची मारहाण झाली होती. यामुळे माध्यमांमध्ये काळजीचा सूर आहे. माध्यमांवर सत्ताधारी गटाकडूनच हल्ले होत असल्याने याप्रकरणी प्रशासन आणि पोलिसांनी दखल घेण्याची मागणी होत आहे.
योग्य ती कारवाई करणार
“पहाटेच ही घटना घडली. मला एका कार्यक्रमानिमित्त बाहेर जायचे असल्याने पत्रकार, कॅमेरामन आणि माझ्या वाहन चालकात काही बाचाबाची झाली. या दोघांमध्ये काय वाद झाला हे मला प्रत्यक्ष माहिती घेतल्यावर समजेल. योग्य ती कारवाई ही चालकावर केली जाईल. कुणाची काय मानसिकता असू शकते हे लवकर समजू शकत नाही. पण महापौर म्हणून मला असे वाटते की, माझ्या चालकाने असे कुणावर हल्ला करणे योग्य नाही. मला वाटतं या प्रकरणात काही वाद असेल तर तो माझ्यापर्यंत यायला हवा होता. याप्रकरणात योग्य ती कारवाई करण्यात येईल.” असे ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी भूमिका मांडली.