Tukaram Mundhe Video : ‘महाराजांनी आज खऱ्या अर्थाने हाराचा स्वीकार केला असेल’; तुकाराम मुंढेंचा व्हिडीओ चर्चेत, नेमकं काय घडलं?
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळील एका व्हिडीओने सोशल मीडियावर लक्ष वेधलं आहे. या व्हिडिओला पाहून अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत, पण एका प्रतिक्रियेने सर्वाचं लक्ष वेधलं आहे.

महाराष्ट्रातील धडाकेबाज आणि कडक शिस्तीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. आपल्या कडक कार्यपद्धतीने ओळखल्या जाणाऱ्या मुंढेंचा एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला ‘महाराजांनी आज खऱ्या अर्थाने हाराचा स्वीकार केला असेल’, अशी भावनिक कॅप्शन देण्यात आल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
एफडीएच्या कारवाईमुळे मुंढे चर्चेत
दरम्यान, २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले तुकाराम मुंढे सध्या महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. या पदाचा ताबा घेतल्यापासून त्यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ, हॉटेल्समधील अस्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. राज्यभरातील रेस्टॉरंट्सवर धडक कारवाया केल्यामुळे ते सध्या पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात कायम आहेत.
व्हिडीओची जोरदार चर्चा
याच दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका अश्वारूढ पुतळ्याजवळील प्रचंड खास आणि कोणाही शिवप्रेमीला आकर्षित करेल असलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात मोठी गर्दी दिसत असून, अनेक नागरिक हा क्षण मोबाईलमध्ये कैद करताना दिसून येत आहेत. त्यामुळे मुंढेंच्या कडक शिस्तीशी आणि कामाशी जोडून हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, तुकाराम मुंढे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आहे. त्यामुळे काहींनी म्हटलं की आज खऱ्या अर्थाने महाराजांनी हाराचा स्वीकार केला असेल. यामागील तर्क असा की, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात ज्यापद्धतीने स्वराज्याचा कारभार चालवला. जो बाणा, कडक शिस्त आणि धडाकेबाज निर्णय घेणारी वृत्ती त्यांच्यामध्ये होती. तीच वृत्ती त्यांना त्यांच्या खऱ्या मावळ्यांकडून अपेक्षित आहे. त्या संदर्भाने तुकाराम मुंढे यांच्या कामाचा धडाकाही तसाच असल्याने चाहत्यांनी ही कॅप्शन दिलं आहे.
व्हिडीओमागील नेमका संदर्भ
दरम्यान, हा व्हिडिओ पुण्यातील आहे. एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. स्वतः तुकाराम मुंढे यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याला त्यांनी प्रेरणास्त्रोत असं एका शब्दाचं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कार्यपद्धती आणि नागरिकांमधील त्यांच्या कामाविषयीची उत्सुकता यांमुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.