सुप्रिया सुळेंशी सोयरिक जुळताच भाजपने डाव टाकला, व्याही थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, राजकारणात नवा ट्वीस्ट

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून भाजपचे सह-कोषाध्यक्ष अरुण लाखानी यांचे नाव आघाडीवर आहे.

सुप्रिया सुळेंशी सोयरिक जुळताच भाजपने डाव टाकला, व्याही थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, राजकारणात नवा ट्वीस्ट
Arun LakhanI Supriya sule
| Updated on: May 25, 2026 | 10:24 AM

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील रखडलेल्या १७ विधान परिषद जागांसाठी अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. सध्या जागावाटप आणि उमेदवारांच्या निवडीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. या राजकीय धामधुमीत विदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे वरिष्ठ नेते आणि उद्योजक अरुण लाखानी यांचे नाव पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पार्श्वभूमी

राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर आता विधान परिषदेच्या १७ जागांसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होत आहे. तर यासाठी २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली ही जागाही गेल्या काही काळापासून रिक्त असल्याने विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांमध्ये या निवडणुकीवरून कमालीची उत्सुकता आहे. या जागेवर भाजपकडून अरुण लाखानी यांना मैदानात उतरवले जाण्याची शक्यता सर्वाधिक वर्तवली जात आहे.

सुप्रिया सुळेंचे व्याही आणि भाजपचे ‘सह-कोषाध्यक्ष’

अरुण लाखानी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी व्याही आहेत. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि अरुण लाखानी यांचे सुपुत्र सारंग लाखानी यांचा विवाह निश्चित झाला आहे. राज्यात कौटुंबिक आघाड्या आणि राजकीय तटबंदी वेगवेगळ्या असल्याच्या अनेक चर्चा सुरू असतानाच, भाजपने नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन प्रदेश कार्यकारिणीत अरुण लाखानी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

अरुण लाखानी यांची भाजपच्या ‘सह-कोषाध्यक्ष’ (Co-Treasurer) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण लाखानी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी, विशेषतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत.

गेल्या निवडणुकीतही या मतदारसंघातून अरुण लाखानी यांच्या नावाची आघाडीवर चर्चा झाली होती. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजताच त्यांचे नाव पुन्हा पुढे आल्याचे पाहायला मिळत आहे. अरुण लाखानी हे ‘विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ (VIL) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी नागपूरमधील प्रसिद्ध २४x७ जलवितरण प्रकल्प आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसारख्या विदर्भातील मोठ्या विकास प्रकल्पांचे नेतृत्व केले आहे.

तसेच ‘लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट’च्या माध्यमातून ते गडचिरोली आणि विदर्भातील दुर्गम आदिवासी भागांत ५०० हून अधिक एकल शिक्षक शाळा चालवतात. तसेच, ‘रुणाधार ट्रस्ट’च्या माध्यमातून त्यांनी विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या कौशल्य विकासासाठी मोठे काम केले आहे. या सामाजिक कार्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांचा थेट संपर्क आहे. तसेच महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे (MBA) अध्यक्ष म्हणूनही त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.

राजकीय समीकरणे तापणार

दरम्यान विधान परिषदेच्या १७ जागांच्या निमित्ताने महायुतीमध्ये भाजप, शिवसेना-शंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. त्यातच आता भाजप विदर्भातील आपल्या हक्काच्या जागा स्वतःकडेच ठेवण्याच्या तयारीमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या जागेवर अरुण लाखानी यांच्यासारख्या वजनदार चेहऱ्याला संधी देऊन भाजप आपली पकड अधिक मजबूत करण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. कौटुंबिक सोयरिक आणि त्यानंतर लगेचच भाजपच्या मुख्य प्रदेश कार्यकारिणीत मिळालेले स्थान यामुळे विदर्भातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.

Follow Us