भाजपमध्ये मोठा भूकंप होणार? 100 नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात? वडेट्टीवारांनी उडवली खळबळ
विधान परिषद निवडणुकीपूर्वी पूर्व विदर्भात राजकीय खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे ६० हून अधिक नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा असतानाच, विजय वडेट्टीवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, १०० हून अधिक भाजप नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात आहेत. पक्षांतर केलेल्यांवर कारवाईचा इशारा देत, वडेट्टीवारांनी निवडणुकीतील वाढत्या पैशाच्या वापराबाबतही चिंता व्यक्त केली आहे.

आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पूर्व विदर्भातील काँग्रेसचे काही नगरसेवक नॉट रिचेबल असून ते भाजपचे स्थानिक आमदार बंटी भांगडिया यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर, गडचिरोली येथील 60 हून अधिक नगरसेवक हे अज्ञातस्थळी गेल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवारांना हा धक्का मानला जात होता. यामुळे खळबळ माजलेली असतानाच दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांच्या एका विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काँग्रेसचे 60 पेक्षा अधिक नगरसेवक गायब असल्याची चर्चा असतानाच, वडेट्टीवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ” आमच्याही संपर्कात भाजपचे 100 पेक्षा जास्त नगरसेवक आहेत, त्यांच्यातही प्रचंड वाद आहेत, दुसरा गट आम्हाला मदत करायला तयार आहे ” असं मोठं विधान वडेट्टीवार यांनी केलं आहे. ते नगरसेवक कोण, कुठले, याविषयी मात्र वडेट्टीवार यांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही. असं असलं तरीही त्यांच्या या विधानामुळे मोठी खळबळ माजली असून भारतीय जनता पक्षाच्या गोटात मात्र मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले वडेट्टीवार ?
काँ ग्रेस पक्षाचा उमेदवार अजून ठरलेला नाही, आज तीन वाजता झूम मीटिंग आहे, महाविकास आघाडीत कोणती जागा कोणाला सोडायची यावर आज चर्चा करू. आमच्याही संपर्कात भाजपचे 100 पेक्षा जास्त नगरसेवक आहेत, त्यांच्यातही प्रचंड वाद आहेत, दुसरा गट आम्हाला मदत करायला तयार आहे पण आम्ही त्यात भानगडीत पडत नाही, असं ते म्हणाले. 15 लाख एका नगरसेवकाला दिल्यास निवडणुका होत असतील तर मला वाटतं लोकशाही भविष्यात शिल्लक राहील की नाही हा भविष्यात खरा प्रश्न आहे, असं विधानही वडेट्टीवार यांनी यावेळी केलं.
गेलेल्या नगरसेवकांवर होणार कारवाई
आमचा उमेदवार ठरलेला नव्हता म्हणून काही लोकांना टोकन म्हणून पाच पाच लाख रुपये दिल्याची माहिती आहे. ही शंभर कोटींची निवडणूक आहे. सिंदेवाही नगराध्यक्ष परत येईल त्यांच्यावर कारवाई होईल, जे जे नगरसेवक गेले, जे त्यांचा पक्षाच्या व्हीप झुगारून गेले त्यांच्यावर कारवाई होईल, व्हीप जरी करू योग्य कारवाई होईल, असा इशारा ही वडेट्टीवार यांनी दिला.
पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्यावरून वडेट्टीवारांची टीका
देशातील पेट्रोल-डिझेलच्या टंचाईवरूनही वडेट्टीवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले. ” ही टंचाई कृत्रिम नाही. काल अमेरिकेने पुन्हा निर्णय लादला, भारताने ईरान आणि रशियाकडून तेल खरेदी करू नये असा फतवा अमेरिकेने काढलाय. त्यामुळे ही टंचाई कृत्रिम नाही, ही टंचाई निर्माण करण्यास सरकार जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे डिझेल पेट्रोल मिळत नाही आणि दरवाढ होत आहे. ही पेट्रोल दरवाढ उद्या दीडशे रुपये वर जाईल, डीझेल 140 रुपये पर्यंत जाईल, पुढच्या महिन्याभरात ही परिस्थिती होईल” असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.
सध्या फक्त एका वेळेलाच मोठी दरवाढ न करतात, एक-एक, दोन- दोन रुपये दर हे दररोज वाढत आहे. ही फार गंभीर परिस्थिती आहे कोरोना पेक्षा विस्फोट, अधिक वाईट परिस्थिती देशात निर्माण होईल, देश उध्वस्त होईल, असा इशारा त्यांनी दिला. एपस्टिन फाईल आणि अदानीचं प्रकरण मुळे हा देश अमेरिकेच्या दावणीला बांधला गेलेला आहे, असे टीकास्त्र वडेट्टीवार यांनी सोडलं.