तुकाराम मुंढेंचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला, म्हणाले, दुष्काळाकडे समस्या म्हणून पाहू नका, तर….
दुष्काळाकडे संधी म्हणून पाहिलं पाहीजे, त्याच्याकडे समस्या म्हणून पाहणं सोडून द्या, असं आवाहन तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते.

दुष्काळाकडे केवळ समस्या म्हणून पाहू नका, तर त्यात संधी शोधा, असा महत्त्वपूर्ण सल्ला आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवडमधील ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो’मध्ये बोलताना त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळाच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी केवळ पावसावर अवलंबून न राहता दुग्ध व्यवसायासारख्या पूरक व्यवसायांना प्राधान्य दिले पाहिजे, कारण ही काळाची गरज आहे. सोबतच, हा दुष्काळ नेमका का पडला? याची कारणे आणि त्यावरील उपायांचा सखोल अभ्यास करण्याचे आवाहनही त्यांनी केले. संकटात खचून न जाता भविष्याचा विचार करून व्यवसायाचे नवे मार्ग शोधा असं आवाहन ही मुंढेंनी केलं.
नेमकं काय म्हणाले मुंढे?
शासनाचं काम मदत करणं काम आहे, ते करत राहतील. सध्याच्या परिस्थितीकडे आव्हान म्हणून नव्हे तर प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणून बघा, दुष्काळ येतो पण आपण पुढील सहा ते सात महिन्यात काय करु शकतो, याचा विचार करा असं तुकाराम मुंढे म्हणाले. दुष्काळाच्या काळात दुग्ध व्यवसायात संधी आहेत. याशिवाय ग्रामीण भागात पाणी अडवा पाणी जिरवाची गरज असल्याचं देखील यावेळी मुंढेंनी सांगितलं आहे.
मी अन्न व औषध प्रशासन क्षेत्रात काम करतो, त्यामध्ये दूध येतं. आपल्याकडे दुधाची कमतरता आहे. दूग्ध उद्योजक आणखी वाढू शकतो. दूधाला दर मिळू शकतो का, हो अजूनही वाढू शकतो. दोन चार महिन्यात दर वाढलेले ते आहेत आणखी वाढतील. आपण ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय करायचं ठरवलं तर त्याच्यात खूप संधी आहे. गाई घ्याव्या लागतील, पाणी लागेल असा प्रश्न आहे पण या क्षेत्रातील गैर प्रकार रोखले पाहिजेत, यात मी नियामक म्हणून पूर्णपणे काम करतोय, तुम्हा सगळ्यांचा यामध्ये सहभाग हवा आहे. कमी पाण्यात दुग्ध व्यवसाय करु शकतो, शुद्ध दूध असेल तर त्याला मागणी आहे, दुग्ध आधारित उद्योग करता येतात, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.
आपण दरवर्षी टँकर मागतो, ट्यूबवेल मागतो कधीतरी आपण या प्रश्नाचा विचार केलाय का, आपण दरवर्षी शासनाकडे मागतो, शासन देतं पण ते जातं कुठं. एका गावासाठी ट्यूबवेल किती केल्या असतील तर त्याचं अकाऊंटिंग केलंय का? असाही सवाल तुकाराम मुंढे यांनी केला.