6 ते 7 थार, 2 स्कॉर्पिओ, 3 जेसीबी, 8 ट्रॅक्टर, अनेक दुचाकी जिंकून देणाऱ्या ओम्याचा खुराक काय होता ? ऐकाल तर चाट पडाल
बैलगाडा शर्यतीत आपल्या वेगाची दहशत माजवणाऱ्या ओम्या बैलाचा अखेर मृत्यू झाला आहे. या बैलाने आपल्या मालकाला अक्षरश: करोडपती केले. या बैलाचा खुराक तुम्ही ऐकला तरी चाट पडाल ...

गेल्या दशकभरात मावळ येथील शर्यतीत ओम्या बैलाचा दबदबा इतका होता की बैलगाडी शर्यत म्हणजे ओम्या पहिला येणारच अशी त्याची ख्याती होती. या ओम्या बैलाने २७ ऑगस्ट रोजी जगाचा निरोप घेतला. बैलगाडा शर्यतीत आपल्या वेगाची दहशत माजवणाऱ्या ओम्या बैलाचा मृत्यू अनेकांना पचनी पडलेला नाही. या ओम्या बैलाला त्याचे मालक ओम्याचे मालक रामनाथ वारिंगे हे प्रेमाने त्याची निगा राखत होते. 27 तारखेला ओम्याने पाणी प्यायले आणि काही वेळ निवांत बसला नंतर शिंगाने तो माती उकरु लागला. अर्ध्या तासात स्थिती बदलली आणि तो निपचित पडला. त्याची जीभ बाहेर पडली होती आणि दात हलत होते. ओम्याचा मृत्यू विषारी सापाच्या दंशाने झाला असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
ओम्या हा मैसूर जातीचा तगडा बैल होता. त्याच्या मालकाने 2016-17 दरम्यान जालना जिल्ह्यातून त्याला आणला होता. हा बैल शर्यतीच्या आखाड्यात उतरेल तेव्हा चमत्कार करेल असे तेव्हा त्याच्या मालकालाही वाटले नव्हते. त्यानंतर त्याने प्रत्येक घाट गाजवला. नंतर ओम्या बैलगाडा शर्यतीचा ‘राजा’ ठरला. काय नाही केलं या ओम्याने आपल्या मालकाला चांगल करोडपती केलं होतं. कार-ट्रॅक्टर-सोन्या-चांदीची बक्षीसं आणि असंख्य रोकड इनाम ओम्याने शर्यतीत जिंकले होते. सर्वात कमी वेळात शर्यत पूर्ण करण्याचा विक्रमही त्याच्याच नावे होता. 11 मिनिटे आणि 22 सेकंदात पहिला क्रमांक मिळवल्याची कामगिरीही ओम्याच्या नावावर आहे.
ओम्याचा जबरा खुराक…
ओम्याचा खुराक देखील प्रचंड मोठा होता. ओम्याला रोज उडीद डाळ,शेंगदाण्याची पेंड, खारीक,तूप,अंडी, बदाम असा पौष्टिक आहार दिला जात होता. इतकी काळजी घेऊनही त्याचा गमवावे लागल्याने त्याचे मालक रामनाथ वारिंगे हे दु:खी झाले आहेत. ओम्याने मालक रामनाथ वारंगे यांना केवळ श्रीमंतच केलं नाही, तर पंचक्रोशीत एक वेगळी ओळखही मिळवून दिली होती. शेतकऱ्याचा मित्र म्हणून बैलाला आपण ओळखतो. मात्र, ओम्या आणि मालक रामनाथ वारिंगे यांचं नात त्यापलीकडे होते. बैल ओम्यामुळे एरव्ही मालकाच्या गळ्यात विजयाचे हार-तुरे पडायचे. ओम्या गेल्याने मालकालाच ओम्याच्याच गळ्यात अखेरची माळ टाकावी लागली.