11 वर्षांपासून खात होती केस, डॉक्टरांनी पोटातून काढला 1.16 किलोचा गोळा, अजब घटनेची जगभरात चर्चा

डॉक्टरांनी तरुणीशी आणि तिच्या कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा केली. तेव्हा या संपूर्ण प्रकरणामागचं गुपित समोर आलं. ती जेव्हा अवघ्या 9 वर्षांची होती, तेव्हापासून तिला स्वतःचे केस तोडून चघळण्याची आणि गिळण्याची सवय लागली होती.

11 वर्षांपासून खात होती केस, डॉक्टरांनी पोटातून काढला 1.16 किलोचा गोळा, अजब घटनेची जगभरात चर्चा
hairball in stomach of young girl
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 04, 2026 | 8:17 PM

जवळपास प्रत्येकजणच कोणत्यातरी एका कारणासाठी डॉक्टरांकडे गेलेलाच असतो. काही वेळा आपल्याला आपल्या आजाराची माहिती असते तर काही वेळा मात्र आपण आजारबाबत अनभिज्ञ असतो. काही वेळा तर असे काही रुग्ण येतात ज्यांना पाहून डॉक्टरसुद्धा चकित होऊन जातात. सध्या असाच एक प्रकार घडला आहे. एका 20 वर्षीय तरुणीने असं काही करून ठेवलं की ते पाहून खुद्द डॉक्टरही अचंंबितच झाले. सुरुवातीला डॉक्टरांनाही तिच्या पोटातच दुखत असावं असं वाटलं होतं. पण नंतर डॉक्टरांच्या तपासणीत अशी धक्कादायक माहिती समोर आली, ज्याची चर्चा सध्या जगभरात होत आहे.

स्क्रीनवरचं दृश्य पाहून डॉक्टर अक्षरशः अवाक

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणीच्या सुरुवातीला फक्त पोटात दुखत होतं. नंतर तिला प्रचंड पोटदुखी, मळमळ आणि सतत उलट्या होत होत्या. भूक तर आधीपासूनच गायब झाली होती. वजन झपाट्याने कमी होत होतं आणि शरीर कायम थकलेलं असायचं. कुटुंबीयांनी तिला दिल्लीतील द्वारका येथील रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि पोटाच्या वरच्या भागात एक कडक गाठ जाणवली. पोटात नेमकं काय आहे, हे समजण्यासाठी एंडोस्कोपी करण्यात आली आणि स्क्रीनवरचं दृश्य पाहून डॉक्टर अक्षरशः अवाक झाले. तरुणीच्या पोटात अन्नाऐवजी केसांचा एक मोठा आणि घट्ट गोळा तयार झाला होता. हा गोळा इतका मोठा झाला होता की त्याने पोटाचा बहुतांश भाग व्यापला होता.

केस पोटात आले तरी कसे?

डॉक्टरांनी तरुणीशी आणि तिच्या कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा केली. तेव्हा या संपूर्ण प्रकरणामागचं गुपित समोर आलं. ती जेव्हा अवघ्या 9 वर्षांची होती, तेव्हापासून तिला स्वतःचे केस तोडून चघळण्याची आणि गिळण्याची सवय लागली होती. म्हणजे जवळपास 11 वर्षांपासून ती नकळत स्वतःचे केस खात होती. वैद्यकीय भाषेत केस खाण्याच्या या सवयीला ट्रायकोफेजिया म्हणतात. ही केवळ वाईट सवय नसून मानसिक आणि सवयीशी संबंधित समस्या असू शकते.

पोटात चक्क 1.16 किलो केसांचा गोळा

मानवी शरीर केस पचवू शकत नाही. त्यामुळे तरुणीने वर्षानुवर्षे गिळलेले केस तिच्या पोटातच साचत गेले. त्यावर अन्नाचे कण आणि म्युकस चिकटत गेला आणि हळूहळू त्याचा एक कठीण, मोठा गोळा तयार झाला. या गोळ्याला ट्रायकोबेजोअर म्हणतात. या प्रकरणात हा गोळा ‘J’ आकाराचा झाला होता. तो अन्ननलिकेजवळील भागापासून सुरू होऊन संपूर्ण पोट व्यापत छोटी आतडी सुरू होण्याच्या भागापर्यंत पोहोचला होता. डॉक्टरांनी सुरुवातीला एंडोस्कोपीच्या मदतीने हा गोळा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र केसांचा गोळा इतका घट्ट आणि मोठा होता की हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. अखेर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यंत काळजीपूर्वक हा गोळा पोटातून बाहेर काढण्यात आला. या केसाच्या गोळ्याचे वजन चक्क 1.16 किलो होते. सध्या तरुणीची प्रकृती चांगली आहे. तिची पाचनक्रियाही सुधारली आहे. दरम्यान, या प्रकाराची सर्वत्र चर्चा केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us