निवडणूक आयोगाचा अजून एक वाद चव्हाट्यावर, दोन आयुक्तांनी केली या वरिष्ठ अधिकार्यावर कारवाईची मागणी, RIT मधून मोठा खुलासा
Election Commission of India: केंद्रीय निवडणूक आयोग गेल्या महिन्याभरापसून राजकारणाच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आता महिती अधिकारात तर एका मागून एक बॉम्ब फुटत आहेत. यामुळे आयोग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Gyanesh Kumar-Sukhbir Singh Sandhu and Vivek Joshi: केंद्रीय निवडणूक आयोगामागील साडेसाती सुरूच आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित कारभाराविरोधात वातावरण तापलेले आहे. विरोध रस्त्यावर उतरले आहेत. तर कालच राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीची बैठक घेतली त्यात नवीन रणनीती ठरल्याचे समोर येत आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी रणकंदन सुरू असतानाच आता माहिती अधिकारातून एकामागून एक बॉम्ब फुटत आहेत. यामुळे निवडणूक आयोग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मनीष गर्ग यांच्यावर कारवाईची मागणी
निवडणूक आयोगातील मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार आणि आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. इंडियन एक्सप्रेसने याविषयीचे वृत्त छापले होते. संधू आणि जोशी यांनी कुमार यांच्या कारभाराविरोधात कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केल्याचा दावा करण्यात येत होता. तर ताज्या आरटीआय माहितीत तक्रार पत्र दाखल झाल्याचे आणि त्याला उत्तर दिल्याची माहिती नमूद आहे. पण त्यात काय तक्रार केली याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. दरम्यान अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार, संधू आणि जोशी यांनी आयोगातील वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त मनीष गर्ग यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र हरकत नोंदवली आहे. कॅबिनेट सचिवांकडे त्यांनी गर्ग यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
काय आहे ती माहिती?
माजी नौदल अधिकारी लोकेश के. बत्रा यांनी माहिती अधिकारात याविषयीची माहिती मागवली. त्यांच्या अर्जावर प्राप्त फाईल नोटिंगमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला. प्राप्त माहितीनुसार, 29 जुलै 2026 रोजी निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी कॅबिनेट सचिवांना स्वतंत्र पत्र लिहिले. कॅबिनेट सचिव टी. व्ही. सोमनाथन यांच्याकडे त्यांनी मनीष गर्ग यांची तक्रार केली आणि योग्य कारवाईची मागणी केली.
लवकरच मोठ्या आंदोलनाची हाक
सीजेपीचे नेते आता तुरुंगाबाहेर आले आहे. कॉकरोच जनता पार्टीची लवकरच बैठक होणार आहे. त्यात ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी व्यापक आंदोलनाची हाक देण्याची रणनीती ठरू शकते. तर काल संध्याकाळी राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती समोर येत आहे. दिल्ली दणाणून सोडल्यानंतर अचानक राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेस आणि इंडिया आघाडी थंडावल्याने या बैठकीला महत्त्व आले आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी खलबतं झाल्याची चर्चा आहे. लवकरच मोठ्या आंदोलनाची हाक दिली जाऊ शकते.