1200 किमीचा प्रवास 16 तासांत, 1 नोव्हेंबरपासून धावणार नवी वंदे भारत स्लीपर ट्रेन? भाडे, थांबे अन् वेळापत्रक A To Z

भारतीय रेल्वेची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन १ नोव्हेंबरपासून बंगळुरू ते मुंबई दरम्यान धावण्याची शक्यता आहे. या बहुचर्चित ट्रेनचे महत्त्वाचे थांबे, वेळापत्रक आणि संभाव्य तिकीट दरांबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

1200 किमीचा प्रवास 16 तासांत, 1 नोव्हेंबरपासून धावणार नवी वंदे भारत स्लीपर ट्रेन? भाडे, थांबे अन् वेळापत्रक A To Z
Vande Bharat Sleeper Train
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 21, 2026 | 10:55 PM

सणासुदीच्या काळात गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. लवकरच दक्षिण भारताला पहिलीवहिली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस मिळण्याची दाट शक्यता आहे. रेल्वेकडून १ नोव्हेंबरपासून बंगळुरू ते मुंबई दरम्यान ही बहुचर्चित आणि अत्याधुनिक स्लीपर ट्रेन चालवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. सध्या हा केवळ एक प्रस्ताव असला, तरी त्याला लवकरच हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन प्रमुख राज्यांमधील, विशेषतः दोन मोठ्या महानगरांमधील कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान आणि सुखकर होईल.

काय आहेत या ट्रेनची खास वैशिष्ट्ये?

लांब पल्ल्याच्या प्रवासाचा शीण कमी करण्यासाठी आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेनची संकल्पना मांडण्यात आली आहे. दिवाळीसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला ही ट्रेन एक ‘स्पेशल ट्रेन’ म्हणून चालवली जाण्याची शक्यता आहे, ज्यानंतर तिला नियमित सेवेत सामावून घेतले जाईल. बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसमध्ये एकूण १६ डबे असतील. यात प्रवाशांच्या सोयीसाठी ११ डबे थर्ड एसी (3AC), ४ डबे सेकंड एसी (2AC) आणि एक डबा फर्स्ट क्लास एस असणार आहे. या संपूर्ण ट्रेनमध्ये एकाच वेळी तब्बल ८२३ प्रवासी आरामदायी प्रवास करू शकतील.

Loading...

वेळापत्रक आणि महत्त्वाचे थांबे

वेळेची बचत हे या ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. ही ट्रेन संध्याकाळी ७.५० वाजता बंगळुरूच्या सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनलमधून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक ११.५५ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचेल. म्हणजेच सुमारे १२०० किलोमीटरचे हे प्रदीर्घ अंतर अवघ्या १६ तासांत पूर्ण होईल. प्रवासादरम्यान ही एक्सप्रेस अनंतपूर, गुंटकल, रायचूर, कलबुर्गी, सोलापूर, पुणे आणि कल्याण या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल.

किती असेल तिकीट?

रेल्वे प्रशासनाकडून या ट्रेनच्या अधिकृत तिकीट दराची अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार कोचच्या श्रेणीनुसार बंगळुरू ते मुंबई प्रवासासाठी साधारणपणे २,६०० ते ४,२५० रुपयांच्या दरम्यान भाडे असू शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us