नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलला मोठा झटका
राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दल पक्षाला मोठा झटका बसला आहे. नवीन पटनायक यांच्या जवळच्या माणसाने साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

बीजू जनता दल पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार देबाशीष सामंतराय यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय मानले जायचे. त्यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली आहे. पक्षात आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आपण हे पाऊल उचललं असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. “बीजू जनता दलचे अध्यक्ष नवीन पटनायक यांना मी माझा राजीनामा पत्र सोपवतो. पार्टीच्या स्थापनेपासून आजपर्यंत मी सेवा, संघटन आणि समर्पण या धोरणानुसार काम केलं. भविष्यात ओडिशाच्या जनतेसाठी माझा संघर्ष सुरु ठेवेन. जय जगन्नाथ” अशी त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
“आज म्हणजे 25 मे रोजी मी बीजेडीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला राज्यसभेवर पाठवल्याबद्दल मी आपला नेहमीच आभारी राहीन. अविभाजीत कटक जिल्ह्याच्या जनतेची सेवा आणि राष्ट्रीय स्तरावर ओडिशाचे मुद्दे उपस्थित करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो” असं सामंतराय यांनी सांगितलं.
ବିଜୁ ଜନତା ଦଳର ମାନ୍ୟବର ସଭାପତି ଶ୍ରୀ @Naveen_Odisha ଙ୍କୁ ମୋର ଇସ୍ତଫା ପତ୍ର। ଦଳ ପ୍ରତିଷ୍ଠା ହେବାଠୁଁ ଆଜି ଯାଏଁ ମୁଁ ମୋର ସେବା, ସଂଗଠନ ଓ ସମର୍ପଣ ନୀତିରେ କାର୍ଯ୍ୟ କରି ଆସିଛି। ଆଗକୁ ମଧ୍ୟ ଓଡିଶାବାସୀଙ୍କ ପାଇଁ ମୋର ସଂଘର୍ଷ ଜାରି ରଖିବି। ଜୟ ଜଗନ୍ନାଥ 🙏 pic.twitter.com/Qfgy16PbLl
— Debashish Samantaray (@debashish_mla) May 25, 2026
माझा अपमान सुरु आहे
“मी नेहमीच स्वत:ला पक्षाच्या हितासाठी समर्पित केलं आहे. अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पक्षाचं काम केलं आहे. पण अलीकडे मला असं दिसू लागलय की. पक्षाच सुनियोजित पद्धतीने माझा अपमान सुरु आहे. पक्षाला माझ्या सेवांची आवश्यकता नाही. म्हणून मी जनहिताच्या दृष्टीने हा कठोर निर्णय घेतला आहे. तुम्हाला मी माझं राजीनामा पत्र स्वीकारण्याची विनंती करतो” असं देबाशीष सामंतराय यांनी म्हटलं आहे.
पक्षात सर्वकाही आलबेल नाही
देबाशीष सामंतराय हे लवकरच भाजपमध्ये सहभागी होतील अशी माहिती आहे. त्यांनी राज्यसभा अध्यक्ष सीपी कृष्णन यांची भेट घेऊन राज्यसभा सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला आहे. ओदिशामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यापासूनच बीजेडीमध्ये अंतर्गत कलह सुरु असल्याच्या बातम्या येत आहेत. पण एका विद्यमान राज्यसभा खासदाराने पदाचा राजीनामा देणं हे पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट संकेत आहेत.