सर्वात मोठी बातमी ! केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तडकाफडकी मंजुरी
राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार रवनीत सिंह बिट्टू यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पंजाबमध्ये मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून रवनीत सिंह बिट्टू यांना केंद्रीय मंत्रिपदावरून मुक्त करून पंजाबच्या राजकारणात सक्रिय करण्याबाबत पक्षात विचार सुरू असल्याची चर्चा सुरू होती. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवनीत सिंह बिट्टू पंजाब विधानसभा निवडणूक लढवू शकतात. पक्ष त्यांना आगामी निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. आता त्यांच्या जागी नव्या मंत्र्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
राजीनामा देणार हे निश्चित होते…
रवनीत सिंह बिट्टू मोदी सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री होते. भाजपाने काही काळापूर्वी झालेल्या निवडणुकीत त्यांना राज्यसभेवर पाठवले नव्हते, त्यामुळे ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये पंजाबसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजपाकडून त्यांना पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाऊ शकते. कारण पंजाबमध्ये आम आदमी पार्टी, काँग्रेस, भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे.
रवनीत सिंह बिट्टू यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते, मात्र त्यांचा कार्यकाळ गेल्या महिन्यात संपला. त्यानंतर आता त्यांना मंत्रिपद सोडावे लागले आहे. आता त्यांच्या जागी कुणाला संधी मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रवनीत सिंह बिट्टू हे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लुधियाना मतदारसंघातून तर 2009 मध्ये आनंदपूर साहिब मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. ते पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू आहेत. 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.