अखेर कर्नाटकात डी के शिवकुमार पर्वाची सुरुवात, घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, खांदेपालटाचा अध्याय पूर्ण!

डी के शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची तर त्यांच्यासोबतच काँग्रेसचे वरिष्ठ नेते जी परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सिद्धरामय्या यांना आता दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आलेला आहे.

अखेर कर्नाटकात डी के शिवकुमार पर्वाची सुरुवात, घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, खांदेपालटाचा अध्याय पूर्ण!
D K SHIVAKUMAR
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 03, 2026 | 4:51 PM

D K Shivkumar : कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेसमध्ये अखेर खांदेपालट झाले आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता ठरल्याप्रमाणे काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याचे ग्लास हाऊस येथे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, आता कर्नाटकमध्ये डी के शिवकुमार पर्व सुरू झाले आहे.

डी के शिवकुमार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

डी के शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची तर त्यांच्यासोबतच काँग्रेसचे वरिष्ठ नेते जी परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सिद्धरामय्या यांना आता दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आलेला आहे. सिद्धरामय्या यांनी अद्याप आपल्या आगामी राजकीय वाटचालीविषयी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. परंतु ते भविष्यात राज्यसभेत खासदार म्हणून जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अडीच अडीच वर्षांचा ठरला होता फॉर्म्यूला

कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला होता. त्या वेळी कर्नाटकच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी डी के शिवकुमार यांच्याकडे होते. ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी पूर्ण ताकद लावली होती. परिणामी भाजपाला नमवत काँग्रेसने मुसंडी मारली होती. डी के शिवकुमार हे कर्नाटकातील वजनदार नेते आहेत. तेच कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री होतील, असे तेव्हा सांगितले जात होते. परंतु सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्यात आले तर डी के शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. त्याच वेळी अडीच वर्षानंतर शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले जाईल, असे ठरले होते.

मंत्रिमंडळातही मोठे फेरबदल

दरम्यान, आता ठरलेल्या त्याच सूत्रानुसार आता कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदाचे खांदेपालट झाले आहे. डी के शिवकुमार हे कर्नाटकचे 34 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. या शपथविधी सोहळ्यानंतर कर्नाटकात सत्तापरिवर्तनाचा अध्याय संपला आहे. डी के शिकुमार यांच्यासोबत अन्य काही नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मंत्रिमंडळातही अनेक फेरबदल करण्यात आले आहेत. भविष्यात डी के शिवकुमार कर्नाटकच्या विकासासाठी नेमके काय काय करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us