रेल्वे प्रवासात आता मोबाईलवर चुकूनही करू नका ही गोष्ट, थेट जावं लागणार जेलमध्ये, नवा नियम लागू
तुम्ही अनेकदा रेल्वेने प्रवास करत असाल, रेल्वेच्या नियमांचं उल्लंघन केल्यास रेल्वे कायद्यानुसार वेगवेगळ्या दंडाची तरतूद आहे. दरम्यान आता रेल्वेने आणखी एक नवा नियम आणला आहे, यामध्ये थेट तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे.

तुम्ही देखील अनेकदा रेल्वेने प्रवास केलाच असेल, जेव्हा लांब पल्ल्याचा प्रवास असतो, तेव्हा बस किंवा इतर साधनांपेक्षा रेल्वेचा प्रवास अधिक आरामदायी अन् सोईचा वाटतो. मात्र अनेकदा काही प्रवाशांकडून रेल्वेनं घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन होतं. ज्यामध्ये विना तिकीट प्रवास, रेल्वेमध्ये अस्वच्छता करणं, काही कारण नसताना रेल्वेची चैन पूल करणं असे प्रकार घडत असतात. अशा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांसाठी, रेल्वे कायद्यामध्ये विविध शिक्षांची तरतूद आहे. ज्यामध्ये तुमच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाऊ शकतो, किंवा काही प्रसंगी तुम्हाला थेट जेलवारी देखील घडू शकते. आता सर्व रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे रेल्वेने नवा नियम लागू केला आहे.
तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल किंवा प्लॅटफॉर्मवर उभे असाल तर अशा ठिकाणी मोबाईलवर ओपन आवाजात व्हिडीओ ऐकणं किंवा गाणी ऐकणं नव्या नियमानुसार तुम्हाला महागात पडू शकतं. जर तुमच्यामुळे कोणाला त्रास झाला आणि संबंधित प्रवाशाने रेल्वे विभागाकडे याची तक्रार केली तर त्यासाठी तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. जर वारंवार तुमच्याकडून हीच चूक झाली तर मात्र तुम्हाला रेल्वेकडून पाच हजार रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांपर्यंत जेलमध्ये देखील जावं लागणार आहे. दक्षिण रेल्वेच्या वतीने या नव्या नियाबद्दल माहिती देण्यात आली आहे.
दक्षिण रेल्वेने आपल्या या नव्या नियमाबद्दल माहिती देताना सांगितलं की, जर तुम्ही रेल्वेमध्ये प्रवास करत असताना मोबाईलवर ओपन आवाजात गाणी ऐकत असाल आणि त्यामुळे जर कोणाला त्रास झाला तर तुम्हाला त्यासाठी एक हजार रुपयांचा दंड होऊ शकतो, मात्र हीच चूक पुन्हा झाली तर त्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपयांचा दंड आणि सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. सध्या स्मार्ट फोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, रेल्वेमध्ये अनेक जण मोठ्या आवाजात गाणी ऐकतात, त्याचा त्रास प्रवाशांना होतो, ही अडचण लक्षात घेऊन दक्षिण रेल्वेने आता आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे आता मोबाईलवर जर तुम्ही मोठ्या आवाजात गाणी ऐकत असाल तर तुम्हाला थेट जेलमध्ये जावं लागणार आहे.