Eggs Price Hike : साखरेनंतर आता अंडे महागणार, इथेनॉलमुळे सामान्यांचे हाल; वाचा खिशाला किती झळ बसणार?

कोंबडीच्या खुराकसाठी पोल्ट्री फार्म आणि इथेनॉलच्या निर्मितासाठी इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपन्या यांच्यात मका खरेदी करण्यासाठी जणू स्पर्धाच लागली आहे. त्याचा परिणाम म्हणून आता मका या पिकाचीही किंमत वाढली आहे.

Eggs Price Hike : साखरेनंतर आता अंडे महागणार, इथेनॉलमुळे सामान्यांचे हाल; वाचा खिशाला किती झळ बसणार?
EGG PRICE HIKE
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 29, 2026 | 5:10 PM

Eggs Price Hike Update : सध्या भारतात साखर महागल्याने सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. ही साखर थेट 80 रुपयांच्या घरात गेल्याने सामान्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. लवकरात लवकर साखरेचा दर हा पूर्ववत झाला पाहिजे, अशी मागणी केली जातेय. एकीकडे साखरेचा भाव प्रचंड वाढलेला असताना लवकरच भविष्यात चिकनची किंमतही वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. चिकन खायचे असेल तर सामान्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जातोय. पण आता साखर, चिकन यानंतर मांसाहार करणाऱ्या प्रत्येकाला आणखी एक मोठा फटका बसू शकतो. येणाऱ्या हिवाळ्यात अंड्यांचादेखील भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. विशेष म्हणजे आतापर्यंत अंड्यांची झालेली भाववाढ आणि त्याबाबतची आकडेवारीही चकित करणारीच आहे.

भविष्यात नेमकं काय होणार?

भारतात गेल्या वर्षभरात अंड्याची किंमत साधारण 40 टक्क्यांनी वाढली आहे. येणाऱ्या हिवाळ्यात हा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भारतात नेमकं काय होतंय? ही महागाई का वाढतेय, असा सवाल केला जातोय. सध्या सरकारकडून इथेनॉलच्या निर्मितीला दिले जाणारे प्रोत्साहन हेच यामागचे मुख्य कारण आहे.

इथेनॉल निर्मितीमुळे अंडे का महागणार?

भविष्यात अंड्याचा भाव वाढू शकतो. परिणामी सामान्यांच्या खिशाला आणखी जास्त झळ बसणार हे ओघाने आलेच. परंतु इथेनॉल निर्मिती आणि अंड्याची भाववाढ याचा नेमका संबंध काय? असा प्रश्न पडणेही साहजिकच आहे. त्याचं उत्तर मका या पिकात दडलंय. पोल्ट्री व्यवसाय करताना कोंबड्यांचे खाद्यान्न म्हणून मक्याचा वापर केला जातो. दुसरीकडे इथेनॉलच्या निर्मितीसाठीही मका पिकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. याचाच परिणाम म्हणून पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचे अन्न तयार करण्यासाठी जास्त पैसे देऊन मका खरेदी करावा लागतोय. त्यामुळे कुक्कुटपालनासाठी खर्च वाढतोय.

अंड्याची किंमत 9 रुपयांवर

सध्या नॅशनल एग्ज कोऑर्डिनेसन कमिटीच्या आकडेवारीनुसार गेल्या एका वर्षाच्या काळात अंड्याची किंमत 35 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. घाऊक बाजारात एक अंडे साधारण 7 रुपयांना मिळते. किरकोळ बाजारात ग्राहकांना हेच अंडे सध्या 8.50 ते 9 रुपयांना मिळत आहे. एनईसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार भारतातील एकूण उत्पादनापैकी साधारण 37 टक्के मक्या थेट इथेनॉल निर्मितीसाठी वापर होतो. शासकीय आकडेवारीनुसार भारतात साधारण 43.4 मिलियन टन मक्याचे उत्पादन होते. यापैकी 17 मिलियन टन मका थेट इथेनॉलच्या निर्मितीसाठी वापरला जात आहे.

इथेनॉल निर्मितीमुळे फटका, मका पीक महागले

कोंबडीच्या खुराकसाठी पोल्ट्री फार्म आणि इथेनॉलच्या निर्मितासाठी इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपन्या यांच्यात मका खरेदी करण्यासाठी जणू स्पर्धाच लागली आहे. त्याचा परिणाम म्हणून आता मका या पिकाचीही किंमत वाढली आहे. तीन वर्षापूर्वी मका हे पीक 14000 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे खरेदी केले जायचे. आता हाच मका 26500 रुपये प्रति टन रुपयांपर्यंत पोहोचला आहे. द इकोनॉमिक्स टाईम्सनुसार गेल्या पाच महिन्यात मका पिकाची किंमत 20 टक्क्यांनी वाढली आहे.

मका पिकाचे उत्पादन वाढले तरी…

हिवाळ्यात अंड्याची विक्री वाढते. त्यामुळेच आता येणाऱ्या काळात अंड्याचा भाव वाढू शकतो. भारतात मक्याचं उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे. 2022 साली मक्याचे उत्पादन हे 1 मिलियन टन होते. 2024 साली हे उत्पादन 6 मिलियन टन झाले. 2026 साली हेच उत्पादन 17 मिलियन टनापर्यंत वाढले. 2030 सालापर्यंत हे उत्पादन साधारण 25 मिलियन टनापर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, मका पिकाचे उत्पादन वाढलेले असले तरीही भारतात इथेनॉल निर्मितासाठी मक्याचा होणारा वारेमाप वापर भविष्यात पोल्ट्री फार्म उद्योगासाठी डोकेदुखी ठरू शकते. परिणामी सामान्यांना आवडणारे अंडे हेदेखील महाग होऊ शकते. त्यामुळे आता सरकार यातून काय तोडगा काढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us