Hospital Fire: ICUमध्ये तोंडाला मास्क, डोळे उघडताच धुरामुळे अंधार; 95 वर्षांच्या आजीने जे केलं आपल्यालाही सुचणार नाही

Hospital Fire: प्रसाद हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री अचानक आग लागली. पण या आगीची माहिती सर्वात आधी 95 वर्षी आजीने दिली. तिने तोंडाला ऑक्सिजन सपोर्ट, खोलीत संपूर्ण धूर असताना देखील आयसीयू रुम बाहेर चालत जाण्याचे धाडस केले.

Hospital Fire: ICUमध्ये तोंडाला मास्क, डोळे उघडताच धुरामुळे अंधार; 95 वर्षांच्या आजीने जे केलं आपल्यालाही सुचणार नाही
Prasad Hospita
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 04, 2026 | 11:10 AM

दिल्लीतील उच्चभ्रू मालवीय नगरमध्ये एका मोठ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटला आग लागल्यानंतर आता एका हॉस्पिटलला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुझफ्फरपूरच्या प्रसिद्ध प्रसाद रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या आयसीयूमध्ये (ICU) ही आग लागली. ज्यामध्ये गंभीर आजारी रुग्णांना दाखल करण्यात आले होते. यापैकी अनेक रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर होते. असे सांगितले जाते की, आग लागल्यानंतर आयसीयूमध्ये धूर भरला. त्यानंतर रुग्णांचा श्वास कोंडू लागला. मुझफ्फरपूरचे एसएसपी कांतेश कुमार यांनी ४ रुग्णांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर तिथे आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे.

आयसीयू बेड, उपकरणे सर्व जळून खाक

आयसीयूमध्ये लागलेली आग किती भयंकर होती, हे तिथली दृश्ये सांगत आहेत. या आगीत आयसीयूचे बेड, उपकरणे आणि इतर सर्व साहित्य जळून खाक झाले. वेळेवर ९५ वर्षांच्या एका वृद्ध महिलेने सावधगिरी बाळगली नसती, तर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये लागलेल्या या आगीत आणखी अनेक रुग्णांचा मृत्यू होऊ शकला असता. खरं तर, ही ९५ वर्षांची वृद्ध महिला त्याच आयसीयूमध्ये दाखल होती, जिथे आग लागली.

स्वतः ऑक्सिजन मास्क काढून बाहेर पडल्या आजी

९५ वर्षांच्या या आजीने आयसीयूमध्ये धूर पसरताच सर्वात आधी स्वतःच्या तोंडावरील ऑक्सिजन मास्क काढला आणि लगेच उठून बाहेर आल्या. त्यानंतर त्यांनी परिचारिकेला (नर्सला) आयसीयूमध्ये आग लागल्याची माहिती दिली. यानंतर रुग्णालय प्रशासन तात्काळ सक्रिय झाले आणि तेथील रुग्णांना बाहेर काढण्यात आले. तसेच अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली.

“धूर पसरताच मी बाहेर पडले आणि मॅडमला सांगितले…”

ही ९५ वर्षांची वृद्ध महिला मुझफ्फरपूरच्या छपरा मेघ येथील रहिवासी आहे. त्यांचे नाव राधा देवी आहे. त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी सांगितले की, रक्तदाब (बीपी) आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राधा यांनी स्थानिक ‘बज्जिका’ भाषेत सांगितले की, आग लागताच अंधार झाला. आग कशी लागली हे मी कसं सांगू. धूर पसरताच मी बाहेर पडले आणि मॅडमला (नर्सला) सांगितले, तेव्हा मॅडमने आत जाऊन पाहिले. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, जर राधा देवी यांनी वेळेवर नर्सला सांगितले नसते तर जीवितहानी आणखी वाढू शकली असती. राधा देवी यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी सांगितले की, आग रात्री ३.३० च्या सुमारास लागली. धूर पसरताच लोकांना याबाबत सांगण्यात आले. त्यानंतर ३.५५ वाजता अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.

मुझफ्फरपूरचे उपविभागीय अग्निशमन अधिकारी रामनिवास पांडे यांनी सांगितले की, ३.५५ वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही आमचे पथक घेऊन तिथे पोहोचलो. आगीवर नियंत्रण मिळवत तिथे दाखल असलेल्या १५-२० जणांना सुरक्षित बाहेर काढले. दोघांचा तिथेच जागीच मृत्यू झाला होता. तर इतर दोन रुग्णांच्या मृत्यूची माहिती नंतर समोर आली.

Follow Us