Indian Railway: आता रोज बदलणार रेल्वे तिकिटाचे दर? विमानाप्रमाणे यंत्रणेत बदल? रेल्वे विभागाचा मोठा प्लॅन
Indian Railway Ticket Rules: भारतीय रेल्वे दिवसागणिक कात टाकत आहेत. अनेक नवीन मार्ग तयार होत आहेत. त्याचवेळी तिकीट व्यवस्थेतही मोठ्या बदलाची नांदी समोर येत आहे. विमानाप्रमाणेच रेल्वेचे तिकीट दर रोज बदलणार का? काय आहे याविषयीची अपडेट?

Indian Railway Ticket Changes: भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता एक मोठा बदल होण्याची शक्यता समोर येत आहे. विमान प्रवासाच्या धरतीवर आता रेल्वे तिकिटांचे दर रोज बदलण्याची शक्यता आहे. मागणी आणि पुरवठ्यानुसार दरपत्रक हलते राहण्याची शक्यता आहे. म्हणजे आज जी किंमत तुम्ही मोजली, कदाचित उद्या तिकीट महाग अथवा स्वस्त होऊ शकते. विमान तिकिटांप्रमाणे रेल्वेचे तिकीट रोज बदलण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मानले जात आहे. याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
काय आहे नवीन प्रस्ताव?
नवीन प्रस्तावानुसार, सण, उत्सवाच्या हंगामात प्रवाशांची गर्दी होते. या काळात रेल्वे विभाग मूळ भाड्यात वाढ करण्याची शक्यता आहे. पण ही दरवाढ वारेमाप नसेल. पण लांब पल्ल्याच्या प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ बसेल. धामधुमीच्या काळात 25 टक्के दरवाढ प्रस्तावित आहे.
तर नवीन प्रस्तावानुसार, हंगाम नसताना, अनेक प्रीमियम आणि एक्सप्रेस गाड्या कमी प्रवासी घेऊन धावतात. यामध्ये कधी कधी 20-25 टक्क्यांपर्यंत जागा रिक्त असते. अशावेळी रेल्वे मूळ तिकिटांवर 10-25 टक्के सवलत देण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर या माध्यमातून स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना केली जाऊ शकते. तर तिकीट दरासोबतच फुड कूपन अथवा इतर सोयी दिल्या जाऊ शकतात.
ऐनवेळी तिकीट दर स्वस्त
रेल्वे सुटण्याच्या 24 ते 48 तास आधी जर एखाद्या रेल्वे कोचमध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असतील. तर संगणकीय प्रणालीचा उपयोग करत तिकीट दर स्वस्त करण्यात येतील. यामुळे मध्यमवर्गीय, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फायदा होईल. त्यांना स्वस्तात गंतव्य स्थान गाठता येईल. हा प्रस्ताव केवळ विचाराधीन आहे. रेल्वे विभागाने, रेल्वे मंत्रालयाने याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण भारतात रेल्वे ही सरकारी मालकीची आहे आणि कल्याणकारी राज्याचीच नीती सरकारने राबवणे अपेक्षित असते. रेल्वे प्रवास हा स्वस्त आणि सुकर मानल्या जातो. त्यात तिकीट दरांबाबतचा असा प्रस्ताव मंजूर होणे सोपे नसेल.