दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाण्याच्या जप्त फ्लॅटमध्ये घुसखोरी, कुलुपाशी छेडछाड ? ईडीने दाखल केला गुन्हा

इक्बाल इब्राहिम कासकर आणि त्याच्या साथीदारांविरोधात दाखल खंडणी प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासात ही सदनिका जप्त करण्यात आली होती.

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाण्याच्या जप्त फ्लॅटमध्ये घुसखोरी, कुलुपाशी छेडछाड ?  ईडीने दाखल केला गुन्हा
iqbal kaskar and dawood
| Updated on: Oct 23, 2026 | 7:22 PM

कुख्यात माफीया डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्यावर दाखल खंडणीच्या एका प्रकरणातील जप्त मालमत्तेत घुसखोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ठाण्याच्या ईडीने जप्त केलेल्या या मालमत्तेपैकी सिल केलेल्या फ्लॅटमध्ये कोणीतही अनधिकृत प्रवेश करुन कुलूपाशी छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ईडीने आता या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

दाउदचा भाऊ इक्बाल कासकरच्या खंडणी प्रकरणातील ठाण्यातील ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत चक्क घुसखोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यातील ईडीच्या ताब्यातील सदनिकेत अनधिकृत प्रवेश करून कुलूपाशी छेडछाड केल्याचे उघडकीस आले आहे. ठाणे पश्चिमेतील या सदनिकेचा ताबा ईडीने पुन्हा मिळवला आहे. या प्रकरणात १५ ऑक्टोबर २०२६ रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Loading...

इक्बाल इब्राहिम कासकर आणि त्याच्या साथीदारांविरोधात दाखल खंडणी आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाच्या तापासात ही सदनिका जप्त करण्यात आली होती. ८ एप्रिल २०२२ रोजी ही मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. त्यानंतर १७ डिसेंबर २०२४ रोजी ईडीने या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेतला होता.मात्र काही व्यक्तींनी सदनिकेतील कुलूपाशी छेडछाड करून तेथील ताब्याची सूचना काढली आणि मालकीचा दावा केल्याचे तपासात समोर आले आहे.

विशेष न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांच्या उपस्थितीत या सदनिकेतील कुलूप बदलून ताबा सुरक्षित करण्यात आले आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(४) आणि २२३ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आले आहे. युनिटी इन्फ्राप्रोजेक्ट्स बँक घोटाळा प्रकरणी ईडीने ८५.२० कोटींची मालमत्ता जप्त केली होती.
युनिटी इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड बँक घोटाळा प्रकरणात ईडीच्या मुंबई विभागने मोठी कारवाई केली होती.

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे असलेली १४.५१ एकर जमीन ईडीने तात्पुरती जप्त केली होती. सुबर्बन अॅग्रीकल्चर डेअरी अँड फिशरीज प्रा. लि.च्या नावावरील या जमिनीचे मूल्य ८५.२० कोटी रुपये आहे. युनिटी इन्फ्राप्रोजेक्ट्सने २३ बँकांच्या समूहाची सुमारे ३,२०० कोटींची कर्जे घेतल्याचा आणि ती बुडवल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील व्याजासह थकबाकी सुमारे ३,८०० कोटी रुपये आहे. बनावट व्यवहार, निधीचा फेरफार आणि बनावट कंपन्यांमार्फत पैशांचा अपहार केल्याचा ईडीला संशय आला आहे. या कारवाईनंतर प्रकरणात ईडीने जप्त आणि गोठवलेल्या चल-अचल मालमत्तेचे एकूण मूल्य सुमारे १,६०९ कोटी रुपये असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us