अन् गेट बंद झाला, NEET परीक्षेचं स्वप्न राहिलं अधुरं, 60 सेकंद उशीर झाल्याने विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा!

Neet Re Exam : आज भारतासह परदेशातील 5,000 हून अधिक केंद्रांवर NEET-UG ची पुनर्परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी लेट झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

अन् गेट बंद झाला, NEET परीक्षेचं स्वप्न राहिलं अधुरं, 60 सेकंद उशीर झाल्याने विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा!
Neet Re Exam Student
Image Credit source: X
| Updated on: Jun 21, 2026 | 4:43 PM

आज भारतासह परदेशातील 5,000 हून अधिक केंद्रांवर NEET-UG ची पुनर्परीक्षा घेण्यात येत आहे. 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द केल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने ही पुनर्परीक्षा आयोजित केली आहे. यापूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आल्याने ही परीक्षा होत आहे. ही परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली असून यावेळी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. भारतातील 551 शहरांतील 5,440 केंद्रांवर आणि परदेशातील 14 केंद्रांवर ही परीक्षा इंग्रजीसह 12 भारतीय भाषांमध्ये घेण्यात येत आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये परीक्षेपूर्वी घडलेल्या काही घटनांमुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, बेंगळुरूमध्ये चार विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर दुपारी 1.30 वाजण्याच्या अंतिम मुदतीनंतर पोहोचल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. पालकांनी आरोप केला की काँग्रेसच्या रॅलीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे आणि पोलिसांच्या अपुऱ्या व्यवस्थापनामुळे उशीर झाला. त्यामुळे विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला नाही. त्या गेटबाहेर विनवण्या करत होत्या आणि रडत असल्याचेही दिसून आले.

बेंगळुरू आणि मुंबईत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला

समोर आलेल्या माहितीनुसार, दुपारी 1.29 वाजता गेट बंद होण्यापूर्वीची शेवटची सूचना देण्यात आली. नेमके 1.30 वाजता NEET च्या नियमांनुसार मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. मात्र, परीक्षागृहाचे आतील गेटही बंद असल्याने काही विद्यार्थ्यांना आत जाता आले नाही. मुंबईतील परळ परिसरातील महर्षी दयानंद महाविद्यालयातही अशीच परिस्थिती निर्माण झाली. उशिरा पोहोचलेल्या दोन विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.

महाविद्यालय प्रशासनाने नियोजित वेळेचे काटेकोर पालन करत गेट बंद ठेवले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बाहेर नाराजी व्यक्त केली. एका विद्यार्थ्याचे घर कुर्ल्यात तर दुसऱ्याचे डोंबिवलीत असल्याचे सांगण्यात आले. आणखी एका विद्यार्थ्यालाही अवघ्या एका मिनिटाच्या उशिरामुळे प्रवेश मिळाला नाही. पालकांनी पुन्हा काँग्रेसच्या रॅलीमुळे वाहतूक ठप्प झाल्याचा आरोप केला.

उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

एका पालकाने सांगितले की, आम्ही घरातून वेळेवर निघालो होतो, मात्र वाहतूक कोंडीत अडकलो. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांकडे विनंती केली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. मध्य प्रदेशातील भोपाळमध्येही दोन विद्यार्थ्यांना उशिरा आल्यामुळे NEET-UG पुनर्परीक्षेसाठी प्रवेश नाकारण्यात आला. एका विद्यार्थ्याचे काका आमिर कादरी यांनी सांगितले की, परीक्षा केंद्राकडे जाताना त्यांचा अपघात झाला. त्यामुळे विद्यार्थ्याला दवाखान्यात जावे लागले त्यामुळे त्याला उशीर झाला. मात्र केंद्रावर पोहोचल्यानंतरही त्यांना प्रवेश देण्यात आला नाही.

Follow Us