‘एक ज्ञानेश कुमार जाईल अन्…’, बांगलादेशचे नाव घेत AIMIM नेत्याचे मोठे वक्तव्य
AIMIM leader Shaukat Ali: SIR, निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार केवळ हेच विरोधकांच्या अजेंड्यावर आहेत का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला असतानाच AIMIM नेत्याने एक मोठे वक्तव्य केले आहे. त्याचवेळी त्यांनी इंडिया आघाडीवरही टीकास्त्र डागले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडी आणि सीजेपीने मोठे आंदोलन उभारले आहे. राजधानी दिल्ली गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलनाचा आखाडा झाली आहे. राहुल गांधींसह इंडिया आघाडीतील नेत्यांनी उग्र प्रदर्शन केले तर आता ही बाजू सीजेपी नेत्यांनी उचलून धरली आहे. आंदोलनाची धार कमी होत असल्याचा आरोपही होत आहे. त्याचवेळी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षाचे नेते शौकत अली यांचे एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. पक्षाचे प्रमुख अससुद्दीन ओवेसी यांनी या मुद्दावर या अगोदरच भूमिका स्पष्ट केली आहे. ज्ञानेश कुमार यांच्यावर आसूड ओढला आहे.
ज्ञानेश कुमार जाऊन काय होणार?
शौकत अली म्हणाले की, केवळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवून काय होणार? त्यातून काही साध्य होणार नाही. ही लढाई केवळ एका व्यक्तीविरोधात नाही तर संपूर्ण सिस्टिम बदलण्यासाठी व्हायला हवी. त्यांच्या या वक्तव्याने या वादाला फोडणी घातली आहे. त्याचवेळी शौकत अली यांनी इंडिया आघाडीवरही निशाणा साधला. इंडिया आघाडी आमच्या पक्षाशी भेदभाव करते, आम्हाला वाळीत टाकण्याचे काम सुरू आहे. आम्हाला बैठकीलाही बोलवले गेले नाही असा आरोप त्यांनी केला.
उत्तर प्रदेशचे AIMIM चे अध्यक्ष शौकत अली मुरादाबाद येथे पोहचले. त्यांनी विरोधी पक्षांकडून आणि सीजेपीकडून सुरू असलेल्या आंदोलनावर मोठे भाष्य केले. एका ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवल्यावर दुसरा ज्ञानेश त्या पदावर येईल. त्यामुळे आता ही लढाई एका व्यक्तीविरोधात नको, तर सिस्टिम, व्यवस्था बदलण्यासाठी करण्यात यावी असे आवाहन त्यांनी केले.
इंडिया आघाडीवर थेट निशाणा
इंडिया आघाडीवर यावेळी शौकत अली यांनी तोंडसुख घेतले. आमच्या पक्षाला इंडिया आघाडी अस्पृश्य समजते. आम्हाला त्यांच्या कोणत्याच बैठकांना बोलवण्यात येत नाही. पण जेव्हा आंदोलनाची वेळ येते. रस्त्यावर उतरण्याची भाषा होते, तेव्हा इंडिया आघाडीला ओवेसी यांची आवर्जून आठवणे येते, असा टोला अली यांनी राहुल गांधी यांना लगावला. जेव्हा CAA, NRC, तीन तलाक आणि वक्फ महामंडळाला वाचवण्यासाठी प्रदर्शन, आंदोलन होत होते, तेव्हा इंडिया आघाडीचे नेते कुठे गायब होते, असा मोठा सवालही त्यांनी विचारला.