अरे बापरे… PNB बँकेच्या लॉकरमध्ये नकली नोटांचा डोंगर, लाखो रुपये गायब; मोठा खुलासा होताच…

सहारनपूरच्या PNB बँकेत 7.4 कोटींच्या बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. बँकेच्या करन्सी चेस्टमध्ये झालेल्या ऑडिटमध्ये हा घोटाळा उघडकीस आला, ज्यामुळे सुरुवातीला आरबीआयला पाठवलेल्या रकमेतील बनावट नोटांचा सुगावा लागला. बँकेने तात्काळ चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

अरे बापरे... PNB बँकेच्या लॉकरमध्ये नकली नोटांचा डोंगर, लाखो रुपये गायब; मोठा खुलासा होताच...
indian currency
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 01, 2026 | 11:19 AM

उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या पंजाब नॅशनल बँकेच्या घंटाघर येथील सोफिया मार्केट करन्सी चेस्टमध्ये हा घोटाळा झाला आहे. ऑगस्ट महिन्यात ऑडिट दरम्यान बँकेच्या लॉकरमध्ये 7.40 कोटी रुपयाच्या कथित बनावट नोटा आढळून आल्या. यापूर्वी 10-11 ऑगस्ट रोजी आरबीआयला पाठवलेल्या रकमेमध्ये 4.36 लाख रुपयांची बनावट कॅश आढळून आली होती. त्यानंतर बँक प्रशासनाने चौकशी समिती बसवली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिफारसीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नोडल अधिकारी अरुण कुमार चौबे यांच्या तक्रारीनंतर पोलीस आणि बँकेचे अधिकारी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.

आरबीआयमध्ये पाठवलेल्या करन्सीत बनावट रक्कम मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पीएमबीच्या मुख्य प्रबंधक निशा सिंह यांच्या मते, 10-11 ऑगस्टच्या आसपास आरबीआयला रक्कम पाठवण्यात आली होती. त्यात 4.36 लाख रुपये कमी आढळून आले. त्यानंतर बँक स्तरावर एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली. चौकशीमध्ये बँकेत 7.40 कोटी रुपयांच्या बनावट नोटा असल्याचं आढळून आलं.

चौघे सस्पेंड

नोडल अधिकारी अरुण कुमार चौबे यांच्या तक्रारीनंतर मंडल कार्यालयाचे वरिष्ठ प्रबंधक रवि कुमार, करेन्सी चेस्ट प्रबंधक सुशील शर्मा आणि हरियाणाच्या जगाधरी येथील करेन्सी चेस्ट प्रबंधक अमित कुमार यांच्यावर बनावट नोटा प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच हाऊस किपर विशाल कुमार याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बँकेने या प्रकरणाशी संबंधित चौघांना तात्काळ सस्पेंड केलं आहे.

सीसीटीव्हीची तपासणी

या संपूर्ण प्रकरणाबद्दल एसएसपी अभिनंदन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वरिष्ठ बँक अधिकाऱ्याकडून मिळालेल्या प्रत्येक तक्रारीच्या आधारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस आणि बँक आता वेगवेगळ्या शाखेतील चेस्ट पर्यंत पोहोचलेली रक्कम, कॅश रेकॉर्ड, नोटांची पॅकिंग, गणती आणि जुळवण्याची प्रक्रिया सर्व खंगाळून काढत आहे. या शिवाय चेस्टची सीसीटीव्ही फुटेजही पाहिली जात आहे, असं अभिनंदन यांनी सांगितलं.

तर मुख्य प्रबंधक निशा सिंह यांच्या मते, बनावट करेन्सी चेस्टमध्येच ठेवली होती. या बनावट नोटांचं वितरण करण्यात आलं नव्हतं. तसेच या नोटा कोणत्याही बँकेच्या शाखेत पोहोचवण्यात आल्या नव्हत्या. आता यावर चौकशीचा विस्तृत रिपोर्ट आल्यावरच बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. दरम्यान, बँकेने गाईडलाईनच्या हिशोबाने हे संपूर्ण प्रकरण पोलिसांच्या हवाली केलं आहे. तसेच पोलिसांनी सर्व प्रकारची मदत केली जात आहे.

Follow Us