राघव चड्ढा यांना मंत्रिपदाची लॉटरी, PM मोदींच्या टीममध्ये थेट एन्ट्री? या दोन नेत्यांची नावे चर्चेत
Raghav Chadha : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. यात खासदार राघव चड्ढा यांच्यासह आणखी एका नेत्याला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. या विस्तारात पुढील काही वर्षांत विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांवर विशेष लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये पुढील वर्षीच निवडणुका आहेत. त्यामुळे या राज्यामधील प्रतिनिधींना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात भाजप चांगल्या स्थितीत आहे, तर पंजाबमध्ये पक्ष स्वबळावर विजय मिळवण्याची तयारी करत आहे. त्यामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांना भाजपने राज्यसभेचे तिकीट दिलेले नाही, त्यांच्यावर विधानसभेसाठी मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. आता आगामी मंत्रिमंडळ विस्तारात पंजाबमधील दोन मोठ्या नेत्यांना संधी मिळू शकते. यात भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुग आणि आम आदमी पक्षातून भाजपमध्ये सामील झालेले राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्या नावाची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोघांना पंजाबच्या कोट्यातून मंत्रीपद दिले जाऊ शकते.
तरुण चुग यांना महत्त्वाचे खाते मिळण्याची शक्यता
तरुण चुग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक आहे. ते पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील असून त्यांनी एचआरमध्ये एमबीएची पदवी घेतली आहे. ते दीर्घकाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले आहेत आणि सध्या भाजपचे राष्ट्रीय महासचिव आहेत. जम्मू-काश्मीर, तेलंगणा आणि लडाख येथे ते भाजपचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी राज्य भाजप सचिव तसेच राज्य भाजप प्रशिक्षण सेलचे प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. आता मोदी सरकारमध्ये तरुण चुग यांना एखादे महत्त्वाचे मंत्रालय दिले जाऊ शकते.
राघव चड्ढा यांच्या नावाचीही चर्चा
युवकांमध्ये लोकप्रिय असलेले खासदार राघव चड्ढा यांनाही मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. राघव हे एकेकाळी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानले जात होते, मात्र अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह आम आदमी पक्षातील सात राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता आगामी पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राघव चड्ढा यांना महत्त्वाचे मंत्रालय दिले जाऊ शकते.