ज्ञानेश कुमार यांना जावंच लागेल; नेहा बोरा यांचा इशारा, भाजपवरही साधला निशाणा

केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मतचोरीच्या आरोपांवरून राहुल गांधींच्या पुढाकाराने 'इंडिया' आघाडी एकवटली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांनी रणनीती आखली. ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करत लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी हा लढा सुरूच राहील, असा संदेश या बैठकीनंतर देण्यात आला.

ज्ञानेश कुमार यांना जावंच लागेल; नेहा बोरा यांचा इशारा, भाजपवरही साधला निशाणा
| Updated on: Oct 13, 2026 | 6:36 PM

केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कथित मतचोरीच्या आरोपावरून देशभरात सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज राजधानी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांसाठी चहापानाचे आयोजन करण्यात आलं होतं.  राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या चहापानाला, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) अध्यक्षा नेहा बोरा यांच्यासह नागरी समाजातील अनेक सदस्य उपस्थित होते.  याशिवाय समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचे अनेक खासदारही या बैठकीत सहभागी झाले.

या बैठकीनंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी अनेक नेत्यांनी आपले मुद्दे मांडत पुढील निर्णय सांगितला. या दरम्यान आयसाच्या अध्यक्षा नेहा बोरा यांनीही भूमिका मांडली

Loading...

काय म्हणाल्या नेहा बोरा ?

यावेळी आयसा अध्यक्षा नेहा बोरा यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. “ सामान्य नागरिकांचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत. आंदोलन करण्याचा अधिकार हिरावून घेणे चुकीचे आहे. भाजपने लोकशाहीवर हल्ला केला आहे.” असं त्या म्हणाल्या. तसंच “ आमचा लढा भाजपाविरोधात सुरूच राहणार आहे. संविधानाच्या रक्षणासाठी देश एकत्र आला आहे. ज्ञानेश कुमार यांना जावचं लागेल,” असंही नेहा बोरा यांनी नमूद केलं.

भारतीय लोकशाही आणि संविधानाचा सर्वात मोठा शत्रू कोण, असा प्रश्न उपस्थित करत आयसा अध्यक्षा नेहा बोरा यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “या देशातील लोकशाहीचा आणि संविधानाचा शत्रू म्हणजे भाजप,” असा आरोप त्यांनी केला. भाजपला असं वाटत असेल की, लोकशाहीचा पाया असलेल्या मूलभूत तत्त्वांवर हल्ला करायचा, त्यानंतर जेव्हा लोक आपल्या मतदानाच्या हक्कांची मागणी करण्यासाठी आणि निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरतील, तेव्हा त्यांचा आंदोलन करण्याचा अधिकारही हिरावून घ्यायचा आणि तरीही लोक शांत बसतील, तर भाजपने हा गैरसमज बाळगू नये, असं बोरा यांनी सुनावलं.

भाजप लोकशाहीशी तडजोड करू शकतो, संविधानाची मूल्यं पायदळी तुडवू शकतो; कारण भारताला लोकशाही बनवण्यात किंवा संविधानाची मूल्यं जपण्यात भाजपची कधीही भूमिका नव्हती. मात्र, या देशातील सामान्य जनतेने भारताला लोकशाही बनवण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी संघर्ष केला आहे, त्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं आहे. ही जनता चोरून मिळवलेला जनादेश स्वीकारण्यास तयार नाही आणि तडजोड केलेली लोकशाही मान्य करण्यासही तयार नाही, असं बोरा म्हणाल्या.

म्हणूनच सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत, ही अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बाब आहे. देशातील विद्यार्थी म्हणून आणि तरुण पिढी म्हणून आम्हीही एकजुटीने उभे आहोत. आम्हाला माहीत आहे की, येत्या काही महिन्यांत आणि वर्षांत आमचा संघर्ष, ही लढाई केवळ आणि केवळ भाजपविरोधातच असेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us