मुंबईच्या सानिकाकडून ‘माऊंट एव्हरेस्ट’ सर; कडाक्याच्या थंडीत केलं असं काही… पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

वयाच्या 21 व्या वर्षी मुंबईतल्या सानिका शाहने जगातील सर्वोच्च शिखर 'माऊंट एव्हरेस्ट' सर केलं आहे. बेस कॅम्पवर तिने कडाक्याच्या थंडीत भरतनाट्यम सादर केलं होतं. तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.

मुंबईच्या सानिकाकडून माऊंट एव्हरेस्ट सर; कडाक्याच्या थंडीत केलं असं काही... पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान
सानिका शाह
Image Credit source: Instagram
| Updated on: May 29, 2026 | 12:30 PM

वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी भारतीय गिर्यारोहक सानिका शाहने माऊंट एव्हरेस्ट सर केला आहे. माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करून ती प्रकाशझोतात आली होती. या पराक्रमानंतर सानिका बेस कॅम्पवर परतली आहे. सानिकाने इन्स्टाग्रामवर याविषयीची पोस्ट लिहिली आहे. ‘मी आज पहाटे 3.30 च्या सुमारास बेस कॅम्पवर पोहोचले. माऊंट एव्हरेट सर करून मी खूप थकले आहे. पण बेस कॅम्पवर पोहोचण्याचा मला खूप आनंद आहे. माऊंट एव्हरेस्ट हे माझ्या आयुष्यातील सर्वांत आव्हानात्मक, जोखमीचं आणि कठीण काम होतं.’ सानिका 20 मे 2026 रोजी सकाळी 11.23 वाजता (नेपाळच्या वेळेनुसार) जगातील सर्वोच्च शिखरावर पोहोचली होती. यावेळी तिच्यासोबत गिर्यारोहण मार्गदर्शक लक्पा तेन्झिन शेर्पा आणि धनसिंग तामांग होते.

कोण आहे सानिका शाह?

सानिका शाह ही मूळची मुंबईची असून तिने मुंबईतील व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलमध्ये अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. कमी वयात सानिकाने अनेक विक्रम केले आहेत. ती हिमालुंग हिमाल (7126 मीटर) यशस्वीपणे सर करणारी सर्वांत तरुण आणि पहिली भारतीय महिला आहे. 26 ऑक्टोबर 2025 रोजी तिने हा विक्रम केला होता. याशिवाय सानिकाने माऊंट एलब्रस आणि माऊंट किलिमांजारोसुद्धा यशस्वीपणे सर केले आहेत. आता तिने जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टवरही सर केलं आहे.

बेस कॅम्पवरील भरतनाट्यमचा व्हिडीओ-

सानिका शाह ही भरनाट्यम नृत्यांगना आहे. माऊंट एव्हरेटच्या बेस कॅम्पजवळ -15 अंश सेल्सिअस तापमानात भरनाट्यम सादर करतानाचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ‘एव्हरेस्टच्या सागरमाथा देवीच्या चरणी भरतनाट्यम समर्पित करणं हे माझं नेहमीच स्वप्न राहिलं आहे. हे केवळ एक सादरीकरण नाही तर ही एक प्रार्थना आहे. माझ्यासाठी एव्हरेस्ट हे केवळ एक शिखर नाही. तर ती एक पवित्र ऊर्जा आहे, ती देवी आहे’, असं तिने म्हटलं होतं.

माऊंट एव्हरेस्टला दोन बेस कॅम्प असले तरी गिर्यारोहकांकडून सर्वाधिक वापरला जाणारा बेस कॅम्प नेपाळमधील दक्षिण बाजूला आहे. बहुतांश गिर्यारोहक शिखर सर करण्याची सुरुवात दक्षिण बेस कॅम्पपासूनच करतात. हा बेस कॅम्प 5364 मीटर उंचीवर आहे. तिथे सहसा नेपाळमधील लुक्ला विमानतळामार्गे ट्रेकिंग करून किंवा हेलिकॉप्टरने पोहोचता येतं.

Follow Us