हत्तींची अंघोळ पाहत असताना अचानक… हत्ती थेट महिला पर्यटकाच्या अंगावरच पडला, काटा आणणारं दृश्य.. Video व्हायरल
कर्नाटकातील दुबारे हत्ती कॅम्पमध्ये हत्तींची अंघोळ पाहत असताना एका 33 वर्षीय महिला पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन हत्तींच्या लढाईत महिला त्यांच्यामध्ये सापडली आणि चिरडली गेली. या घटनेचा हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील दुबारे हत्ती कॅम्पमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. या कॅम्पमध्ये आलेल्या चेन्नईतील एका 33 वर्षीय महिला पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. दोन हत्तींची लढाई सुरू असताना ही महिला या दोन्ही हत्तींच्यामध्ये फसली आणि चिरडून मेली. ही महिला हत्तींना अंघोळ करताना पाहत होती. त्यावेळी कंचन नावाच्या हत्तीने मार्तंडा नावाच्या हत्तीवर हल्ला केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नदी किनारी असलेल्या सर्वांची एकच धावपळ उडाली आणि त्याचवेळी ही महिला भांबावली. ती सावरण्याच्या आधीच हत्तींच्या कचाट्यात थांबली आणि हत्तीच्या अंगाखाली येऊन चिरडून मेली.
जेव्हा हत्तींची लढाई सुरू झाली आणि ही महिला हत्तींच्या कचाट्यात सापडली तेव्हा तिला वाचवण्यासाठी महावतांनी पुरेपूर प्रयत्न केले. पण त्यांचे सर्व प्रयत्न फोल गेले. लढाई करताना हत्तीचं संतुलन बिघडलं. यातील मार्तंडा हत्ती थेट महिलेच्या अंगावरच पडला. मार्तंडा हत्ती उठत असतानाच ही महिला चिरडली गेली. त्यामुळे तिचा जाग्यावरच मृत्यू झाला. यावेळी महिला प्रचंड किंचाळत होती. जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तिला वाचवण्याचे लोकांनी प्रयत्नही केले. पण हत्तींच्या रुद्रावतारापुढे त्यांचं काही चाललं नाही.
व्हिडीओत काय दिसतंय?
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत नदी किनारी असंख्य हत्ती अंघोळ करताना दिसत आहेत. पर्यटकही किनाऱ्यावर आहेत. काही पर्यटक पाण्यात आहेत. कंचन नावाच्या हत्तीच्या अंगावर माहूत बसला आहे. किनाऱ्यावर दोन महिला आहेत. एकीच्या हातात बाळ आहे. दोन्ही पाण्यात उतरल्यानंतर हत्ती अचानक बेफाम झाले. कांचन हत्तीने मार्तंडावर हल्ला केला. त्यामुळे मार्तंडा हत्ती खाली कोसळला. हत्तींचा हल्ला सुरू झाल्यानंतर या दोन्ही महिलांनी पळण्याचा प्रयत्न केला. त्यातील बाळ घेतलेली महिला पळण्यात यशस्वी झाली. पण दुसरी महिला मार्तंडाच्या अंगाखाली येऊन चिरडली. बराच वेळ मार्तंडा पडलेला असल्याने या महिलेला हालचाल करण्याची आणि निसटण्याची संधीच मिळाली नाही. तर कांचन हत्तीला शांत करण्यासाठी माहुताने प्रचंड प्रयत्न केले. पण त्याच्या प्रयत्नाला यश आले नसल्याचंही दिसत आहे.
⚠️🔞
🇮🇳 Kodagu, #India
On May 18, a 33-year-old woman tourist was killed after she fell and got trapped under an elephant during a sudden clash at Dubare Elephant Camp in Karnataka.
Two camp elephants suddenly turned aggressive while being bathed. One attacked the other,… pic.twitter.com/p9Zc2Ulz8Y
— Ian Collins (@Ian_Collins_03) May 18, 2026
मंत्र्याकडून शोक
दरम्यान, कर्नाटकाचे वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर बी खंड्रे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. बंदीवान केलेल्या हत्तींना ट्रेनिंग दिली जाते. पण ते कोणत्यावेळी काय करतील हे सांगता येत नाही, असं ते म्हणाले. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना काही आदेशही दिले आहेत. पर्यटकांना हत्तीच्या सोंडेला हात लावू देऊ नका, त्यांच्याजवळ उभं राहून फोटो काढू देऊ नका, तसेच हत्तींना अंघोळ घालण्याची किंवा त्यांना काही अन्न देण्याची परवानगीही पर्यटकांना देऊ नका, असे आदेश खंड्रे यांनी दिले आहेत. पर्यटकांनी कोणत्याही वन्यजीव प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
यापूर्वीही असं घडलं
कोडागूच्या याच कॅम्पमध्ये हत्तींसोबत सेल्फी घेण्यासाठी पर्यटक प्रचंड उतावीळ होतात. यापूर्वीही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. गेल्या महिन्यात छत्तीसगडच्या गौरेला पेंड्रा मरवाही जिल्ह्यात एका जंगली हत्तीने 55 वर्षीय व्यक्तीला चिरडून मारले होते. तर मार्चमध्ये उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील कतरनियाघाट वन्यजीव अभायरण्यात एका 80 वर्षीय व्यक्तीला नर हत्तीने चिरडून मारलं होतं.