मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ
पश्चिम बंगालच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कोलकाताच्या कालीघाटमध्ये दुर्गा पूजाच्या मंडपच्या उद्घाटनाच्या वेळी एका तरुणीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. या तरुणीने ममता बॅनर्जी यांची साडी खेचली. तसेच तिच्याजवळील चाकू जप्त करण्यात आला आहे, असा दावा टीएमसीकडून करण्यात आला आहे.
ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्यावरून पश्चिम बंगालमधील राजकारण तापलं आहे. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने टीएमसी नेत्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. आता तर चक्क माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरच हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात येत आहे.
पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगना मतदारसंघात 4 मे रोजीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अभिषेक बॅनर्जी यांच्या अंडीफेक करण्यात आली होती. तसेच सोनारपूरमधील एका गटाने त्यांच्याविरोधात ‘चोर चोर’ अशी नारेबाजी केली होती. अभिषेक बॅनर्जी यांच्यावर चप्पलफेक देखील करण्यात आली होती. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. यानंतर इतर टीएमसी नेत्यांवर देखील हल्ले झाले होते. टीएमसी नेत्यांवर थेट माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर हल्ले होऊ लागले आहेत.
अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर कुणाल घोष यांच्यावर देखील हल्ला झाला होता. एका तरुणाने त्यांच्यावर अंडी फेकली होती. कुणाल घोष हे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या घराबाहेर फोनवर बोलत असताना त्यांच्यावर अंडीफेक करण्यात आली होती. तसेच कुणाल हे सप्टेंबर महिन्यात हुगळीच्या उत्तरपाडामध्ये ममता बॅनर्जी यांच्या एका रॅलीसाठी कार जात होते. त्यावेळी त्यांची कार काही लोकांनी अडवली. त्यानंतर त्यांच्या कारवर अंडी आणि दगडफेक करण्यात आली होती. या हल्ल्यात त्यांच्या कारची काच फुटली होती. टीएमसी नेत्यांवर वारंवार हल्ले होऊ लागल्याने पश्चिम बंगालमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.