tv9 Marathi Special : फडणवीसांचा पाठिंबा, पंकजा मुंडेंचा विधान परिषदेचा मार्ग मोकळा की पुन्हा ट्रॅपमध्ये?

| Updated on: May 28, 2022 | 6:25 PM

tv9 Marathi Special : पंकजा मुंडेंना महाराष्ट्राच्या राजकारणात ठेवायचं असेल तर ते त्यांना इथेच ठेवतील. त्यांना जर विधान परिषदेवर पाठवलं तर विरोधी पक्षनेता कोण ही अडचण असेल.

tv9 Marathi Special : फडणवीसांचा पाठिंबा, पंकजा मुंडेंचा विधान परिषदेचा मार्ग मोकळा की पुन्हा ट्रॅपमध्ये?
फडणवीसांचा पाठिंबा, पंकजा मुंडेंचा विधान परिषदेचा मार्ग मोकळा की पुन्हा ट्रॅपमध्ये?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यातील विधान परिषदेच्या दहा जागा रिक्त झाल्या आहेत. यात भाजपशी आणि मित्रपक्षांच्या चार ते पाच जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे भाजप (bjp) नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर पाठवण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. माझी कोणाशीही चर्चा झाली नाही. निवडणुका आल्या की माझे नाव समोर येते. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, अशी सावध प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. तर पंकजा मुंडे या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या सर्वच पदांसाठी पात्र आहे. विधान परिषदेसाठी माझा त्यांना पाठिंबाच आहे. पण याबाबतचा निर्णय केंद्रातूनच होत असतो, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी व्यक्त केली आहे. फडणवीस यांनीही सावध भूमिका घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. फडणवीस यांचा खरोखरच पंकजा मुंडे यांना पाठिंबा आहे? पंकजा मुंडे यांचा विधान परिषदेचा मार्ग मोकळा झालाय की पुन्हा हा ट्रॅप आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

मार्ग सोपा आणि सुकर झालाय असं वाटत नाही

एनालायजर न्यूजचे संपादक सुशील कुलकर्णी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एक तर फडणवीसांनी आपला पंकजा यांना विरोध नाही हे दाखवलं आहे. सर्व निर्णय केंद्रात होतात हे सांगितलं आहे. याचा अर्थ मी काही करत नाही हा संदेश फडणवीसांना द्यायचा आहे. उद्या पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली गेली नाही किंवा आमदार केलं नाही तर मी पाठिंबा दिला होताच. ते झालं नाही त्याला केंद्रीय नेतृत्व जबाबदार आहे असा सावध पवित्रा फडणवीसांनी घेतला आहे. पंकजा मुंडेंच्या बाबत जे काही कपात होते. जिथे कुठे संधी मिळत नाही तिथे फडणवीस असतात अशी मुंडे समर्थकांमध्ये चर्चा असते. त्यामुळे त्यांनी आधीच काऊंटर करून ठेवलंय की त्या सर्व पदांसाठी पात्र आहेत. पण त्याचा निर्णय केंद्र करेल असं त्यांनी म्हटलंय. ही सोयीस्कर आणि सुकर भूमिका आहे. त्यांचा मार्ग सुकर आणि सोपा झालाय असं मला वाटत नाही, असं सुशील कुलकर्णी यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी अडचण

पंकजा मुंडेंना महाराष्ट्राच्या राजकारणात ठेवायचं असेल तर ते त्यांना इथेच ठेवतील. त्यांना जर विधान परिषदेवर पाठवलं तर विरोधी पक्षनेता कोण ही अडचण असेल. प्रवीण दरेकर निवृत्त झाले आहेत. दरेकर आणि पंकजा मुंडे या पैकी कोण? असा प्रश्न निर्माण झाल्यावर पंकजा मुंडे यांचं नाव येईल. नियमानुसार विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता हा सीनियर असतो. तिथे मोठी अडचण निर्माण होऊ शकते, असंही कुलकर्णी यांनी सांगितलं.

उमेदवारी मिळेल असं वाटत नाही

पंकजा मुंडेंनी सांगितलंय की मी विधान परिषदेवर जावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कारण जनसमर्थन त्यांच्याकडे आहे. मागच्यावेळी विधान परिषदेसाठी सर्व कागदपत्रं तयार करायला सांगितल्यानंतर त्यांचं नाव वगळलं गेलं. पक्षांतर्गत राज्यस्तरावर जे काही राजकारण सुरू आहे. त्यात पंकजा मुंडे राष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटला उत्तर म्हणून आणि पत्रकारांनी प्रश्न विचारला म्हणून देवेंद्र फडणवीसांनी हे स्टेटमेंट केलं आहे. तसा अर्थाअर्थी पंकजा यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी यावर चर्चा होत असेल असं वाटत नाही, असं दैनिक लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार वसंत मुंडे यांनी सांगितलं.

पंकजा यांनाही शाश्वती नाही

पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील छुपा संघर्ष अनेकदा उघड झालाय. तो काही लपून राहिला नाही. अशातला भाग नाही. औरंगाबादचा मोर्चा लोकल लोकांचा मोर्चा असल्याचं पंकजा यांनी म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना सावध भूमिका घेतली. पण केंद्रीय पातळीवर निर्णय कधी होतो? जेव्हा राज्य स्तरावरून शिफारस जाईल तेव्हाच निर्णय होतो. राज्यपातळीवरचं राजकारण पाहता पंकजा मुंडे यांची लीडरशीप राज्यातील होती. त्यांचा पराभव झाल्यावर त्यांना अंतर्गत राजकारणातून राष्ट्रीय स्तरावर संधी दिली.

त्या मध्यप्रदेशाच्या प्रभारी आहेत. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याची शक्यता कमी आहे. पंकजा म्हणाल्या, मी विधान परिषदेवर जावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याचा दुसरा अर्थ पंकजा मुंडे यांची इच्छा असली तरी पक्षात निर्णय होईलच याची त्यांना शाश्वती नाही. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांची इच्छा म्हटलं आहे. दुसरीकडे फडणवीसांनी सावध भूमिका घेत केंद्रीय पातळीवर निर्णय होईल असं म्हटलंय. राज्य पातळीवरून जी शिफारस जाते त्याला अनुकूलता दर्शवली जाते हे ज्यांना राजकारण समजतं त्यांना कळतं, असंही वसंत मुंडे यांनी सांगितलं.

चूक दुरुस्त करण्याची संधी

2019च्या निवडणुकीत फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या आणि स्पर्धकांना दूर सारलं. काहींना तिकीट नाकारलं. काहींना पाडण्याचं काम केलं. ओबीसी आणि अन्य समाजाचे नेते पाडण्यात फडणवीसांची भूमिका होती असं वातावरण त्यावेळी होतं. त्याचा फटका फडणवीस आणि भाजपला बसला. विदर्भात 12 ते 13 आमदार पडले. विनोद तावडे आणि राम शिंदे पडले. दोन वर्षात फडणवीसांना केंद्रातून फार पाठिंबा मिळाला नाही. अजित पवार यांच्यासोबतचा पहाटेचा प्रयोग फसला. फडणवीसांच्या काळात व्यक्ती केंद्रीत राजकारण सुरू केलं होतं. त्याचा फटकाही पक्षाला बसला. फडणवीसांना चूक दुरुस्त करण्याची संधी आहे. बहुजन समाज हा भाजपचा बेस कायम आहे हे दाखवण्याची संधी आहे. पंकजांचं पुनर्वसन होणार असेल तर पक्ष आणि फडणवीस यांनाही फायद्याचं असेल. या लोकांना तिकीट नाकारलं तरी त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली नाही, असं ज्येष्ठ राजकीय पत्रकार विवेक भावसार यांनी सांगितलं.

भीतीपोटी भूमिका जाहीर केली असावी

पंकजा मुंडे यांची केंद्राने दखल घेतली आहे. त्यांना काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्यामुळे महिला आणि ओबीसी म्हणून त्यांचं पुनर्वसन केलं जाऊ शकतं ही फडणवीसांना भीती असावी म्हणून त्यांनी भूमिका जाहीर केली असेल, असंही भावसार यांनी सांगितलं.