
कुटुंब, क्राइम आणि माइंड गेमचं परफेक्ट समीकरण.. प्रत्येक सीनमध्ये चकीत करणारा ट्विस्ट आणि सस्पेन्सचा भरणा असलेली दमदार कथा. जर तुम्ही सिनेप्रेमी असाल आणि त्यातही जर तुम्हाला सस्पेन्स थ्रिलर सर्वाधिक आवडत असतील तर हा चित्रपट तुम्हाला नक्कीच थक्क करेल. 2 तास 19 मिनिटांचा हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. यातल्या प्रत्येक सीनमध्ये भीती, राग आणि न्यायाची मागणी इतकी तीव्र आहे की प्रेक्षकांना ही कथा त्यांच्याच आयुष्यातला एक भाग वाटू लागते. निष्पाप लहान मुलांच्या अचानक गायब होण्यापासून या चित्रपटाची कथा सुरू होते. पुढे यात अशा एका खलनायकाचा उलगडा होतो, ज्याची क्रूरता अंगावर अक्षरश: काटा आणते.

या कथेत थरार, भावना आणि भय या सर्वांचा मेळ आहे, जो प्रत्येक सीननुसार अस्वस्थता आणखी वाढवतो. उत्तम अभिनय आणि दमदार स्क्रीनप्ले यांच्या जोरावर चित्रपटाच्या कथेला आणखी ताकद मिळते. या चित्रपटाच्या कथेतील ट्विस्ट इतके मजबूत आहेत की मोठमोठे अॅक्शनपट आणि मसालापट यासमोर फिके वाटू लागतात.

ज्या चित्रपटाबद्दल आम्ही इथे बोलतोय, त्याचं नाव 'चित्ता' असं आहे. हा मूळ तमिळ भाषेतील चित्रपट तुम्ही हिंदीतही पाहू शकता. या चित्रपटाची कथा इतकी जबरदस्त पद्धतीने गुंफण्यात आली आहे की शेवटपर्यंत तुम्हाला त्यातील खलनायक कोण हे समजत नाही.

'चित्ता' या चित्रपटात अत्यंत छोट्या गोष्टींवरही बरीच मेहनत घेण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा लहान मुलींवरील अत्याचारावर आधारित आहे. यामध्ये सुंदरी नावाची 5-6 वर्षांची एक मुलगी असते, जिच्या वडिलांचं निधन झालेलं असतं. ती तिच्या काका (सिद्धार्थ) आणि आईसोबत राहत असते.

एके दिवशी सुंदरीच्या शाळेतल्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार होतो आणि त्याचा आरोप तिच्या काकावर लावला जातो. मात्र नंतर समजतं की सुंदरीचंच अपहरण झालं आहे. या प्रकरणात नंतर दुसराच आरोपी असल्याचं लक्षात येतं. पोलीस आणि सिद्धार्थ मिळून आरोपीला कसं पकडतात, याची ही कथा आहे.

2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेता सिद्धार्थनेच केली आहे. तर एस. यू, अरुण कुमार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये निमिषा सजयन आणि सिद्धार्थ यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. अवघ्या 5 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनला आहे.

29 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 69 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात दोन-चार नव्हे तर तब्बल सात पुरस्कार आपल्या नावे केले होते. आयएमडीबीवरही (IMDb) या चित्रपटाला 8.2 रेटिंग मिळाली आहे.