मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!
शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे बिबट्याच्या हल्ल्याची एक थरारक घटना घडली असून, एका धाडसी सुनबाईने प्रसंगावधान राखत सासूबाईंचा जीव वाचवला.

शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे ही थरारक घटना घडली. पुष्पाबाई रंगनाथ नलगे या घरासमोरील अंगणात खाटेवर झोपल्या असताना दबक्या पावलांनी बिबट्या त्यांच्या जवळ पोहोचला.

बिबट्याची चाहूल लागताच घरातील सदस्यांनी आरडाओरड सुरू केली. सासूबाई संकटात असल्याचे पाहताच सुनबाई आणि नातू क्षणाचाही विलंब न करता बाहेर धावले. सुनबाईने धाडसाने बिबट्याला सामोरे जात प्रतिकार केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.

या प्रसंगात पुष्पाबाई नलगे यांचा जीव थोडक्यात बचावला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या घटनेत सुनबाई आणि नातवाने दाखवलेले धैर्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले असून, संकटसमयी त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि शौर्याची गावभर चर्चा रंगली आहे.

सासूबाईंचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घेतलेली झुंज कौतुकास्पद असल्याच्या भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केल्या जात आहेत.