AC Maintenance Tips: एसी फिल्टर कधी साफ करावा आणि फुल सर्व्हिसिंग केव्हा करावी?
उन्हाळ्यात सतत ७ ते ८ तास एसी चालवताय? मग एसी खराब होण्यापूर्वी आणि विजेचे बिल वाढण्यापूर्वी त्याची सर्व्हिसिंग कधी व कशी करावी, याच्या सोप्या व महत्त्वाच्या टिप्स येथे सविस्तर जाणून घ्या.

यंदा उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. उन्हाळ्यात घराघरात एसी (AC) चा वापर कमालीचा वाढतो. अनेक घरांमध्ये तर सलग ७ ते ८ तास एसी सुरूच असतो. मात्र, एसी वापरण्याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. बहुतेकांना असं वाटतं की वर्षातून एकदा एसीची सर्व्हिसिंग केली की झालं! तर काही जण थेट एसी बंद पडेपर्यंत किंवा त्यात बिघाड होईपर्यंत सर्व्हिसिंग करून घेण्याची तसदीच घेत नाहीत.

परंतु, जर तुम्हाला भविष्यात होणारा मोठा दुरुस्तीचा खर्च वाचवायचा असेल आणि विजेचे बिल नियंत्रणात ठेवायचे असेल, तर एसीची नियमित देखभाल करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वर्षभरात एसीची सर्व्हिसिंग नेमकी कधी आणि किती वेळा करायला हवी, याबद्दल जाणून घेऊया.

एसीच्या इनडोअर युनिटमधील एअर फिल्टर दर २ ते ४ आठवड्यांनी नियमितपणे स्वच्छ केला पाहिजे. फिल्टर स्वच्छ राहिल्याने एसी उत्तम कूलिंग देतो आणि विजेची बचत होते. हा फिल्टर तुम्ही व्हॅक्यूम क्लिनरने किंवा साध्या पाण्याने घरच्या घरी सहज स्वच्छ करू शकता.

एसी कंपन्यांच्या मते, दर ३ ते ६ महिन्यांनी इव्हॅपोरेटर कॉइल आणि ड्रेन पाईप स्वच्छ करणे गरजेचे असते. कॉइल स्वच्छ करण्यासाठी मऊ ब्रशचा वापर करावा. तसेच, पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी दर २ ते ३ महिन्यांनी ड्रेन पाईप आवर्जून तपासावा व स्वच्छ करावा.

एसीची सखोल आणि सुरक्षित स्वच्छता करण्यासाठी व्यावसायिक तंत्रज्ञाची (Technician) मदत घेणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. 'क्रोमा'च्या अहवालानुसार, वर्षातून किमान ६ ते १२ महिन्यांतून एकदा एसीची प्रोफेशनल सर्व्हिसिंग झालीच पाहिजे. यामध्ये इनडोअर आणि आउटडोअर अशा दोन्ही युनिट्सच्या सखोल स्वच्छतेसोबतच गॅसची पातळी (Gas Level), वायरिंग आणि इतर इलेक्ट्रिकल भागांची तपासणी केली जाते.

एसी सर्व्हिसिंगची वारंवारता तुम्ही राहता त्या परिसरावरही अवलंबून असते. जर तुमच्या भागात धुळीचे प्रमाण जास्त असेल, तर फिल्टर्स आणि कॉइल्स लवकर घाण होतात. अशा वेळी ठरविक वेळेआधीच एसीची स्वच्छता करून घेणे फायदेशीर ठरते.