Mutual Funds : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना झटका! 29 पैकी 22 फंडांचा परतावा निगेटिव्ह, फक्त 2 फंड ठरले हिट
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड्सच्या एका वर्षातील कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 29 पैकी तब्बल 22 फंड्सचा परतावा निगेटिव्ह राहिला, तर केवळ 2 फंड्सनी 8 टक्क्यांहून अधिक परतावा दिला. नेमके कोणते फंड ठरले फायदेशीर आणि कोणत्या फंड्सनी गुंतवणूकदारांना निराश केले? जाणून घ्या सविस्तर माहिती.

सध्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीकडे ओढा वाढत आहे. मात्र, ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड्सच्या गेल्या एका वर्षातील कामगिरीने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे.
गेल्या एका वर्षात ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड्स श्रेणीतील 29 पैकी तब्बल 22 फंड्सनी निगेटिव्ह परतावा दिला आहे. तर केवळ दोन फंड्सना 8 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवण्यात यश आले आहे.
व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, बँक ऑफ इंडिया ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंडने सर्वाधिक 12.1 टक्के परतावा दिला आहे. तर नवी ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड 8.42 टक्के परताव्यासह दुसऱ्या स्थानावर आहे.
एचडीएफसी ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंडने एका वर्षात 6.87 टक्के निगेटिव्ह परतावा दिला आहे. त्यामुळे या श्रेणीतील सर्वाधिक निगेटिव्ह परतावा देणारा फंड म्हणून त्याची नोंद झाली आहे.
एसबीआय ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंडकडे 86,163 कोटी रुपयांची निव्वळ मालमत्ता असून त्याने 0.18 टक्के निगेटिव्ह परतावा दिला आहे. तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंडकडे 50,703 कोटी रुपयांची मालमत्ता असून त्याचा परतावा उणे 2.83 टक्के राहिला आहे.
निगेटिव्ह परतावा देणाऱ्या फंड्सकडे सुमारे 12.33 लाख कोटी रुपयांची मालमत्ता असून ती या श्रेणीतील एकूण मालमत्तेच्या 19 टक्के आहे. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणुकीचा निर्णय घेताना तीन आणि पाच वर्षांची कामगिरी, बेंचमार्कशी तुलना, आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची क्षमता विचारात घ्यावी.