आयपीएलचं फायनल असूनही ‘देऊळ बंद 2’चे शोज हाऊसफुल्ल; अख्ख्या महाराष्ट्रात चित्रपटाची क्रेझ, किती कमाई?
रविवारी आयपीएलचा अंतिम सामना होता. फिनालेकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून होतं. मात्र आयपीएलच्या धामधुमीतही 'देऊळ बंद 2' या चित्रपटाचा डंका वाजल्याचं पहायला मिळालं. रविवारी राज्यातील शोज हाऊसफुल्ल होते.

प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. वीकेंडला स्वामीभक्त थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे रविवारी आयपीएलचा अंतिम सामना असतानाही या चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल होते. याविषयी माहिती खुद्द प्रवीण तरडेंनी दिली आहे.

"आज आयपीएलचं फायनल आहे. या दिवसांत भलेभले लोक चित्रपट प्रदर्शित करत नाहीयेत. आपण केला आणि आज 'देऊळ बंद 2'चे अख्ख्या महाराष्ट्रात सगळे शोज हाऊसफुल्ल आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या चित्रपटामागे कुठलंही चॅनेल, किंवा मोठी कंपनी नाही. एका सामान्य प्रोड्युसरने हा चित्रपट प्रदर्शित केला आहे," असं तरडे म्हणाले.

यावेळी चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री आणि प्रवीण तरडेंची पत्नी स्नेहल तरडेनंही प्रेक्षकांचे आभार मानले. दोन आठवड्यात आपण 50 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडतोय, ही सगळी स्वामींची कृपा.. असल्याची भावना प्रवीण तरडेंनी यावेळी व्यक्त केली.

'देऊळ बंद 2' या चित्रपटाने फक्त 11 दिवसांत 50.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटानंतर 'देऊळ बंद 2'ला मराठीत खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत हा सध्या सहाव्या स्थानी आहे.

'देऊळ बंद 2' या चित्रपटात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न मांडण्यात आला आहे. अकरा वर्षांपूर्वी 'देऊळ बंद'चा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. आता दुसऱ्या भागात स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. मोहन जोशी हे पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत परतले आहेत.