Dhamaal 4 : ‘धमाल 4’च्या कमाईचा डंका! फक्त 4 दिवसांत गाठला जादुई आकडा
Dhamaal 4 Box Office Collection : 'धमाल 4' या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत कमाईचा मोठा टप्पा पार केला आहे. या कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय.

सध्या बॉक्स ऑफिसवर कॉमेडी चित्रपटांचा चांगला काळ सुरू आहे. अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'नंतर आता अजय देवगणचा 'धमाल 4' हा चित्रपट छप्परफाड कमाई करतोय. दमदार कथानक, कलाकारांचं अभिनय, अचूक विनोदाचं टायमिंग यांमुळे या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. अवघ्या चार दिवसांत या कॉमेडी चित्रपटाने कमाईचा मोठा टप्पा गाठला आहे.

फक्त भारतातच नाही तर परदेशातही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी 'धमाल 4'ने जगभरात 10 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे. यासोबतच आता या कॉमेडी ड्रामाचा जगभरातील एकूण कमाईचा आकडा 102 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. फक्त चार दिवसांत या चित्रपटाने ही दमदार कामगिरी केली आहे.

याआधी 'बॉर्डर 2', 'धुरंधर : द रिव्हेंज', 'भूत बंगला', 'कॉकटेल 2' आणि 'वेलकम टू द जंगल' यांसारख्या चित्रपटांनी प्रदर्शनाच्या चार दिवसांत 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला होता. 'धमाल 4' या चित्रपटाने शुक्रवारी 15.50 कोटी रुपये, शनिवारी 23.31 कोटी रुपये आणि रविवारी 28.40 कोटी रुपये कमावले होते.

सोशल मीडियावर होणारी सकारात्मक चर्चा, प्रेक्षकांचे रिव्ह्यू यांमुळे अधिकाधिक प्रेक्षकवर्ग 'धमाल 4' पाहण्यासाठी थिएटरकडे वळत आहे. कमाईची हीच गती कायम राहिली तर हा चित्रपट लवकरच 'सुपरहिट'चा टॅग आपल्या नावे करणार असल्याचं दिसतंय.

'धमाल 4' या चित्रपटाचं दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केलं असून यामध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजीदा शेख, संजय मिश्रा यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. 'धमाल' फ्रँचाइजीमधील हा चौथा चित्रपट आहे. याआधीही तीन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.