पेट्रोल – डिझेलचं माहीती नाही, पण पंपावर बसतात जेवणाच्या पंगती, पंप मालकाचं सर्वत्र कौतुक
संपूर्ण देशात सध्या पेट्रोल - डिझेलचा तुटवडा भासत आहे. अनेक पंप तर बंद झाले असून, अनेक ठिकाणी फक्त 1000 रुपयांपर्यंत पेट्रोल मिळत आहे. ज्यामुळे इंधन घेण्यासाठी वाहन धारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे... अशात एका पंप मालकाने तर रांगेत उभ्या असणाऱ्यांना जेवण दिलं आहे... पंपावर जेवणाच्या पंगती बसत आहेत.

जळगावच्या धरणगाव येथे पेट्रोल पंप चालकांकडून पेट्रोलचे घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांसाठी जेवणाची पंगत बसवण्यात आली आहे. पेट्रोल डिझेलचा साठा संपल्याने डिझेल घेण्यासाठी मुक्कामी थांबलेल्या शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंप चालकाने माणुसकी दाखवली

पेट्रोल पंपचालकाकडून डिझेल घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना चक्क कढी आणि खिचडीची मेजवानी देण्यात आली. सध्या याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी पंप मालकाचं कौतुक देखील केलं आहे.

धरणगाव -चोपडा रस्त्यावरील पवार पेट्रोल पंपावर मध्यरात्री उशिरा डिझेलचा साठा येणार असल्यामुळे शेतकरी उपाशीपोटी मुक्कामी थांबले होते. डिझेल घेण्यासाठी मुक्कामी थांबलेल्या शेतकऱ्यांचे हाल होऊ नये म्हणून पेट्रोल पंप चालकाकडून जेवणाची खिचडी आणि कढीची सोय करण्यात आली

डिझेलसाठी मुक्कामी थांबलेल्या शेतकऱ्यांकडून देखील पेट्रोल पंप चालकाने दाखवलेल्या माणुसकीच कौतुक करण्यात आलं. एकीकडे डिझेल घेण्यासाठी शेतकऱ्यांचे मोठे हाल होत असताना पेट्रोल पंप चालकाच्या या माणुसकीची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा रंगली आहे.

इंधन साठा कमी असताना इंधन दर वाढले आहेत. कारण पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. याच कारणामुळे, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती.