
आपल्यापैकी अनेकांना आंघोळीनंतर किंवा कानात खाज आल्यावर इअरबड्स किंवा कापसाच्या बोळ्याने कान स्वच्छ करण्याची सवय असते. ही पद्धत अत्यंत सामान्य वाटत असली, तरी तुमच्या आरोग्यासाठी आणि कानासाठी ती अत्यंत घातक ठरू शकते.

वैद्यकीय संशोधनानुसार, कान स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही बाहेरील वस्तूंचा वापर करणे हे फायद्यापेक्षा जास्त नुकसान देणारे ठरते. कानात तयार होणारे इअरवॅक्स हे प्रत्यक्षात घाण नसून ती शरीरातील एक महत्त्वाची संरक्षक प्रणाली आहे.

या इअरवॅक्समुळे तुमच्या कानाच्या पडद्यापर्यंत धूळ, कचरा आणि लहान जंतू पोहोचत नाही. तसेच इअरवॅक्समध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, जे कानाच्या आतील भागाला संसर्गापासून वाचवतात.

हे इअरवॅक्स कानाच्या आतील नाजूक त्वचेला कोरडे पडण्यापासून वाचवून खाज कमी करते. जेव्हा आपण इअरबड्सने कान साफ करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा बहुतेक वेळा इअरवॅक्स बाहेर येण्याऐवजी कानात अधिक खोलवर ढकलले जाते.

यामुळे इअरवॅक्स गोळा तयार होऊन कानाचा मार्ग पूर्णपणे बंद होऊ शकतो, ज्याला 'इम्पॅक्टेड वॅक्स' म्हणतात. इअरबड्सचा वापर करताना जर चुकून तो जास्त खोलवर गेला तर कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते.

यामुळे असह्य वेदना, सूज आणि कायमचे बहिरेपण येण्याचा मोठा धोका असतो. इअरबड्स निर्जंतुक नसतील किंवा त्यांचा वारंवार वापर केल्यास कानात बाहेरील बॅक्टेरिया किंवा फंगल इन्फेक्शन सहज प्रवेश करू शकतात. यामुळे कानात पू होणे किंवा खाज येण्याच्या समस्या वाढतात.

मानवी कानाच्या रचनेनुसार सामान्यपणे जबड्याच्या हालचालींमुळे जुने मेण आपोआप कानाच्या बाहेरच्या बाजूला येते. त्यामुळे जर तुम्हाला कानाची स्वच्छता करायची असेल तर आंघोळीनंतर केवळ कानाच्या बाहेरील भागाला मऊ टॉवेलने पुसा.

जर तुम्हाला कानात जडपणा वाटत असेल, कमी ऐकू येत असेल किंवा जास्त घाण साचल्याचे वाटत असेल, तर घरगुती उपाय करण्याऐवजी ईएनटी (ENT) तज्ज्ञांकडे जा. ते सुरक्षितपणे यावर उपाय करतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही तेल किंवा ड्रॉप्स कानात टाकू नका.