Parasar Joshi: Indian Idol चा गायक बनला अंपायर, पुण्याच्या पराशर जोशीवर अशी वेळ का आली?
इंडियन आयडलमधील गायक ते क्रिकेटच्या मैदानावरील अंपायर म्हणून काम पाहणारा हा पुण्याचा पराशर जोशी आहे तरी कोण ते पाहा...

पुणेकर पराशर जोशीने क्रिकेटच्या मैदानात आणि संगीत दोन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. एकेकाळी 'इंडियन आयडॉल' या लोकप्रिय सिंगिंग रिॲलिटी शोच्या मंचावर आपल्या गाण्याच्या कौशल्याने प्रभावित करणारा पराशर जोशी हा क्रिकेटच्या मैदानात दिसत आहे.
बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजित केलेल्या एका विशेष पंच विनिमय कार्यक्रमाचा भाग म्हणून तो आता ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर अंपायर म्हणून काम पाहणार आहे.
सध्याच्या रणजी करंडक हंगामादरम्यान, बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक नवीन पंच विनिमय कार्यक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत, ऑस्ट्रेलियन पंच बेन ट्रेलोअर भारतात दोन रणजी करंडक सामन्यांमध्ये पंचगिरी करत आहेत, तर अनुभवी भारतीय पंच पराशर जोशी यांना ऑस्ट्रेलियाला पाठवले जात आहे.
मूळचे पुण्याचे असलेले पराशर यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्याने गायन क्षेत्रात नाव कमावण्यासाठी अथक प्रयत्न केले, पण पहिल्या तीन वर्षांत त्याला ऑडिशन्समध्ये केवळ नकारच मिळाला. अपयशाने खचून न जाता, त्याने चौथ्या वर्षी पुन्हा प्रयत्न केला आणि २००८ मध्ये 'इंडियन आयडॉल सीझन ४' च्या पियानो फेरीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. मात्र, त्यानंतर तो शोमधून बाहेर पडला.
संगीतासोबतच, खेळाशीही त्याचे घनिष्ठ नाते होते. तो क्लब स्तरावर क्रिकेट खेळला, पण नंतर, खेळाचे नियम आत्मसात केल्यावर, त्याने पंचगिरीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट पंचगिरीमध्ये प्रवेश केल्यानंतर, पराशरने झपाट्याने प्रगती केली.