शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे हा साप, नेहमी करतो शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण
शेतकऱ्यांचा मित्र म्हणून या सापाला ओळखलं जातं. शेतकऱ्यांच्या पिकाच्या संरक्षणात करतो नेहमी मदत. तुम्हाला माहिती आहे का या सापाचे नाव?

साप म्हटला की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. मात्र, प्रत्येक साप हा विषारी किंवा माणसांसाठी धोकादायक नसतो. काही साप पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच शेतकऱ्यांसाठीही अत्यंत उपयुक्त ठरतात.
असाच एक साप म्हणजे धामण, ज्याला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखले जाते. धामण साप प्रामुख्याने शेतांच्या आसपास, गवताळ भागात आणि ग्रामीण परिसरात आढळतो. हा बिनविषारी साप असून उंदीर हे त्याच्या प्रमुख भक्ष्यांपैकी एक आहे.
शेतातील उंदरांची संख्या नियंत्रित ठेवण्यात धामण महत्त्वाची भूमिका बजावतो. उंदीर शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करतात. तसेच कापणीनंतर साठवलेल्या धान्यालाही ते हानी पोहोचवतात.
धामण साप उंदरांची शिकार करत असल्यामुळे पिकांचे आणि धान्याचे नुकसान कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शेतीच्या परिसंस्थेत या सापाचे महत्त्व मोठे आहे.
धामण साप दिसायला काहीसा नागासारखा वाटू शकतो. मात्र, तो विषारी नसतो. त्याचे शरीर लांब आणि सडपातळ असून शेपटीही लांब असते. तो प्रामुख्याने आपल्या वेगासाठी ओळखला जातो.