Pooja Raibagi: ‘जय जय स्वामी समर्थ’ फेम अभिनेत्रीचं दुसरं लग्न; कोण आहे होणारा पती?
पूजा ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील कालिंदी या भूमिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली आहे. आता तिच्या वैयक्तिक आयुष्यातील या नव्या पर्वामुळे ती चर्चेत आली आहे.

‘जय जय स्वामी समर्थ’ या लोकप्रिय मालिकेत कालिंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा रायबागी पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. पहिल्या लग्नानंतर घटस्फोटाचा अनुभव घेतलेल्या पूजाच्या आयुष्यात आता नव्या जोडीदाराची एन्ट्री झाली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर होणाऱ्या पतीसोबतचे फोटो शेअर केले असून, तिच्या केळवणाचे व्हिडीओदेखील व्हायरल होत आहेत.
पूजा रायबागीच्या होणाऱ्या पतीचं नाव रजत खन्ना आहे. रजत हा मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याने अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. तो RASSASY या कंपनीचा संस्थापक आणि चेअरमन आहे. याशिवाय त्याने पिरॅमिड ग्रुपसोबतही काम केलं आहे. रजतला क्रिप्टो क्षेत्रात रस असून, त्याला फिरण्याची आणि वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचीही आवड आहे.
पूजाने सोशल मीडियावर रजतसोबतचा फोटो शेअर करत आपल्या नात्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. ‘काही चमत्कार एका क्षणात घडत नाहीत, तर जेव्हा दोन जीव अनपेक्षित वेळी एकमेकांना भेटतात, तेव्हा चमत्कार घडतात,’ अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पूजा रायबागीने २०२२ मध्ये अभिनेता प्रसाद डबके याच्याशी लग्न केलं होतं. मात्र, त्यांचं वैवाहिक नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आता पूजा पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेत असून, रजत खन्नासोबत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.
लग्नापूर्वी पूजाच्या मैत्रिणींनी तिचं केळवण थाटात साजरं केलं. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, पूजासोबत तिची मैत्रीण वैष्णवी हिचंही केळवण एकत्र करण्यात आलं. या सोहळ्यातील आनंदाचे क्षण चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.