नवे कपडे खरेदी केल्यावर एक्स्ट्रॉ फॅब्रिक का मिळतं ? फेकून देण्याआधी हे नक्की वाचा
जेव्हा आपण नवीन शर्ट, कुर्ता किंवा पँट खरेदी करतो, तेव्हा अनेकदा त्यासोबत त्याच कापडाचा एक छोटा तुकडा जोडलेला असतो. बहुतेक लोक तो निरुपयोगी समजून फेकून देतात. मात्र, हा छोटा तुकडा कपडे धुण्यापूर्वी चाचणी करण्यासाठी, इस्त्री करण्यापूर्वी तापमान तपासण्यासाठी आणि कपड्यांची दुरुस्ती करण्यासाठी खूप उपयोगी ठरतो.

नवीन कपडे खरेदी करताना अनेकदा त्यासोबत त्याच कापडाचा एक छोटा तुकडाही मिळतो. बहुतेक लोक तो निरुपयोगी समजून कचऱ्यात फेकून देतात. परंतु, प्रत्यक्षात कंपन्या हा तुकडा एका विशिष्ट उद्देशाने देत असतात. गरज पडल्यास कपड्याला पडलेले छिद्र बुजवण्यासाठी किंवा त्याचा रंग आणि कापडाची चाचणी करण्यासाठी हा छोटा तुकडा खूप उपयोगी ठरू शकतो.
नवीन कपडे खरेदी केल्यानंतर जर त्यांना एखाद भोक पडलं किंवा ते जर कुठून फाटलं, तर त्यांची दुरुस्ती करणं कठीण होऊ शकतं. विशेषतः त्याच रंगाचं किंवा त्याच शेडचं कापड बाजारात मिळत नसेल, तर ही अडचण आणखी वाढते. अशा वेळी कपड्यांसोबत मिळालेला हा छोटा तुकडा खूप उपयोगी पडतो. या तुकड्याच्या मदतीने कपड्याच्या टेलर आतील बाजूने ठिगळ लावू शकतो किंवा रफू करू शकतो. त्यामुळे वेगळं कापड शोधण्याची गरज नाही.
नवीन घेतलेले कपडे धुताना त्यांचा रंग जाईल की नाही, हे आधीच समजणं कठीण असतं. काही प्रकारचे कापड डिटर्जंट किंवा पाण्याच्या संपर्कात आल्यावर रंग सोडू शकतात. त्यामुळे मुख्य कपडा धुण्यापूर्वी या छोट्या तुकड्याला पाणी आणि साबणामध्ये भिजवून रंगाची चाचणी करता येऊ शकते. त्याचा जर रंग जात असेल तर तो नवीन कपड़ा वेगळा धुवावा.
प्रत्येक प्रकारच्या कापडाला एकाच तापमानावर इस्त्री करता येत नाही. काही सिंथेटिक किंवा नाजूक कापडांवर अति गरम इस्त्री फिरवल्यास ते जळू शकतात किंवा आकसू शकतात. अशा वेळी कापडाच्या या छोट्या तुकड्यावर इस्त्री करून उष्णतेची चाचणी घेता येते. त्यामुळे त्या कापडाला किती उष्णता सहन होते, याचा अंदाज येऊ शकतो. मात्र, शक्यतो कपड्याच्या लेबलवर दिलेल्या इस्त्रीविषयक सूचनांचे पालन करणे अधिक सुरक्षित असते.
प्रत्येक कपड्यासोबत कापडाचा असा छोटा तुकडा मिळतोच असंही नाही. ते तर त्याच कपड्यांचा ब्रँड, त्यांची गुणवत्ता आणि पॅकिंग करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं. काही प्रीमियम किंवा डिझायनर कपड्यांसोबत अतिरिक्त बटणं आणि त्याच कापडाचा छोटा तुकडा दिला जातो. मात्र, सर्व ब्रँड्सकडून अशी पद्धत वापरली जातेच असे नाही.
आता पुढच्या वेळी नवीन कपड्यांसोबत असा छोटा तुकडा मिळाला, तर तो लगेच फेकून देण्याऐवजी जपून ठेवा. भविष्यात कपडे फाटल्यास दुरुस्तीसाठी किंवा कापडाचा रंग आणि उष्णतेची चाचणी करण्यासाठी तो उपयोगी ठरू शकतो.
याशिवाय, कपडे दीर्घकाळ चांगले टिकावेत यासाठी त्यावरील वॉशिंग इन्स्ट्रक्शन्स म्हणजेच धुण्याच्या सूचना असलेले लेबल वाचणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामध्ये कपडे कसे धुवावेत, किती तापमानावर इस्त्री करावी आणि त्यांची काळजी कशी घ्यावी, याची माहिती दिलेली असते.