25 वर्षांत इतकी बदलली ‘लगान’मधली ‘गोरी मॅम’, तिसऱ्या लग्नानंतर आमिर खानने घेतली भेट
गौरी स्प्रॅटसोबत तिसऱ्या लग्नानंतर आमिर खानने 'लगान' या चित्रपटातील एका व्यक्तीची भेट घेतली आहे. या अभिनेत्रीने आमिर खानच्या चित्रपटात एलिझाबेथची भूमिका साकारली होती. आता 25 वर्षांनंतर तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

'लगान' हा आमिर खानच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वपूर्ण चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल की नाही, अशी अनेकांना शंका होती. मात्र 'लगान' फक्त ब्लॉकबस्टरच बनला नाही, तर क्लासिक चित्रपटांच्या यादीत त्याने स्थान बनवलं.

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित या चित्रपटातील सर्व कलाकार प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले. त्यापैकीच एक परदेशातील कलाकार रेचन शैलीसुद्धा आहे. 'लगान' या चित्रपटात रेचलने ब्रिटिश रेजिमेंट कमांडर अँड्र्यू रसेलची (पॉल ब्लॅकथॉर्न) बहीण एलिझाबेथ रसेलची भूमिका साकारली होती.

रेचलचं भुवनवर (आमिर खान) प्रेम असतं आणि गावातील लोक तिला 'गोरी मॅम' म्हणून हाक मारायचे. नुकतीच रेचल लंडनमध्ये आयोजित 'लगान'च्या सिल्वर ज्युबली कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी आमिर खाननेही तिची भेट घेतली.

रेचलचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'आमच्या बालपणीची गोरी मेमसाहब', असं एकाने लिहिलं. तर 'भुवन आणि एलिझाबेथ यांची ग्रेट भेट', असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. इतक्या वर्षांत रेचल जराही बदलली नसल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

'लगान' या चित्रपटानंतर रेचल हिंदी चित्रपटांपासून दूर गेली होती. तिने अनेक वर्षांपर्यंत कोणत्याच हिंदी चित्रपटात काम केलं नव्हतं. 2023 मध्ये 'कोहरा' या वेब सीरिजमधून तिने पुनरागमन केलं होतं.