नागरिकांनो घरातच राहा! पोलिसांना सापडली जिवंत स्फोटकांची बॅग, हाय अलर्ट जारी
एका माजी संचालकाच्या घराच्या अंगणात १५ जिलेटिन कांड्या आणि ५८ जिवंत डेटोनेटर सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त आणि बॉम्ब शोधक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात आज सकाळच्या सुमारास एक थरारक घटना समोर आली. नागपूर शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या गणेश पेठ येथील डोसर भवन परिसरातील एका निवासस्थानात जिलेटिनच्या काड्या आणि जिवंत डेटोनेटर सापडले आहेत. त्यामुळे संपूर्ण पोलीस प्रशासन हादरून गेले आहे. विशेष म्हणजे ही स्फोटके जी.एस. कॉलेजचे माजी संचालक उज्ज्वल लांजेवार यांच्या घराच्या अंगणात आढळून आली आहेत.

आज सकाळी लांजेवार कुटुंबातील सदस्य अंगणात आले असता, त्यांना एक बेवारस बॅग पडलेली दिसली. संशय आल्याने त्यांनी ती उघडून पाहिली असता त्यात स्फोटकांसारखे साहित्य दिसले. त्यांनी विलंब न लावता तातडीने नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गणेश पेठ पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळ गाठले. त्यानंतर संपूर्ण परिसर सील केला. यावेळी बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) केलेल्या प्राथमिक तपासणीत १५ नग जिलेटिन कांड्या, ५८ नग डेटोनेटर आणि ८ नग कनेक्टर आढळून आले आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके एका रहिवासी भागात आणि ते ही एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरात सापडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त (CP) रविंद्र सिंगल यांनी आपला नियोजित कार्यक्रम सोडून थेट डोसर भवन गाठले. त्यांनी लांजेवार कुटुंबियांशी चर्चा केली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवण्याचे आदेश दिले.

हे साहित्य कोठून आले आणि ते तिथे कोणी ठेवले, याचे मूळ शोधणे आमचे प्राधान्य आहे," असे आयुक्तांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच पोलिसांनी परिसरातील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले आहे. मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास कोणी ही बॅग तिथे फेकली का, याचा शोध घेतला जात आहे.

सामान्यतः जिलेटिनचा वापर विहिरी खोदण्यासाठी किंवा खाणकामात केला जातो. मात्र, शहराच्या मध्यभागी अशाप्रकारे स्फोटके मिळणे हा एखाद्या मोठ्या कटाचा भाग असू शकतो का, या दृष्टीने एटीएस (ATS) देखील समांतर तपास करण्याची शक्यता आहे.

तसेच 'पेसो' (PESO) आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (FSL) तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. हे स्फोटक किती जुने आहे आणि त्याची क्षमता किती होती, याचे विश्लेषण केले जात आहे.

गणेश पेठ हा भाग बस स्थानक आणि रेल्वे स्थानकाच्या जवळ असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. स्फोटके सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी जवळील दुकाने बंद ठेवायला सांगितली असून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.