LPG : पेट्रोल-डिझेल पाठोपाठ पुन्हा गॅस दरवाढीचे झटका? त्या आकडेवारीने ग्राहकांची डोकेदुखी वाढणार?
LPG Price Hike?: पेट्रोल-डिझेल प्रति लिटर जवळपास 4 रुपयांनी महागले आहे. यापूर्वी 60 रुपयांनी घरगुती गॅस सिलेंडर वधारले होते. आता पुन्हा एलपीजी दरवाढ होण्याची भीती वर्तवली जात आहे. काय आहे त्यामागील कारण? त्या आकडेवारीने सर्वांनाच चिंतेत टाकले आहे.

LPG Price Hike?: देशात पुन्हा गॅस सिलेंडरचे दर भकडणार का? अशी चर्चा होत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर जवळपास 4 रुपयांनी महागले. तर आता एलपीजी दरवाढीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामागे काही आकडेवारी आहे. त्याआधारे हा दावा करण्यात येत आहे.

मध्य-पूर्वेतील संकटामुळे भारतात प्रत्येक दिवशी 4,00,000 बॅरल एलपीजीचा तुटवडा होत असल्याचे समोर आले आहे. निक्केई आशियाने याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार एप्रिल महिन्यात भारतात एलपीजी आयात 3,77,620 बॅरल प्रति दिवस होती. तर फेब्रुवारीत आयातीचा आकडा हा 8,51,870 एलपीजी बॅरल प्रति दिवस इतका होता.

निक्केई आशियाने हा अहवाल Kpler या संस्थेच्या आकडेवारीवरून दिला आहे. जर लवकरच होर्मुज संकट दूर झाले नाही तर देशात एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची आणि आयात खर्च वाढण्याची शक्यता त्यात वर्तवण्यात आली आहे. या संकटामुळे एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल.

या अहवालानुसार, एप्रिल महिन्यात कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरचे उत्पादन वाढवलं आहे. हे उत्पादन आता 5,30,000 बॅरल प्रति दिवसावर आले आहे. पण नैसर्गिक गॅसचा पुरवठा खंडीत झाल्यास त्याचा फटका उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. सरकार एलपीजी पुरवठा सुरळीत करण्यासाठी ॲक्शन मोडवर आले आहे. त्यासाठी विविध उपाय करण्यात आले आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, तेल उत्पादक कंपन्यांना 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरवर 674 रुपयांचे नुकसान होत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारवर एलपीजी किंमत वाढवण्यासाठी दबाव असल्याचे मानले जात आहे.

या अहवालानुसार, संयुक्त अरब अमिरात, कतार, कुवेत आणि सौदी अरब हे देश भारताला जवळपास 80 टक्के एलपीजी पुरवठा करतात. या देशांनी एप्रिल महिन्यात प्रत्येक दिवशी 43,000 बॅरल एलपीजीचा पुरवठा केला. तर ऑस्ट्रेलियाकडून एलपीजी पुरवठा होण्यासाठी 20 दिवस, अर्जेटिना आणि अमेरिकेतून नैसर्गिक गॅसची खेप पोहचण्यासाठी 35 ते 45 दिवस लागतात.